Home चंद्रपूर भिमजयंतीत भाजप अनुसूचित जाती युवा मोर्चा जिल्हाध्यक्षाकडून गोंधळ, मारहाण येल्लापूरमध्ये तणाव;...

भिमजयंतीत भाजप अनुसूचित जाती युवा मोर्चा जिल्हाध्यक्षाकडून गोंधळ, मारहाण येल्लापूरमध्ये तणाव; पोलिसांत गुन्हा दाखल

0
599

भिमजयंतीत भाजप अनुसूचित जाती युवा मोर्चा जिल्हाध्यक्षाकडून गोंधळ, मारहाण

येल्लापूरमध्ये तणाव; पोलिसांत गुन्हा दाखल

जिवती : तालुक्यातील येल्लापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजप अनुसूचित जाती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुबोध चिकटे व त्यांच्या काही सहकाऱ्यांकडून गोंधळ घालत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही भिमजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी १० एप्रिल रोजी ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत १४ एप्रिल रोजी छोटेखानी अभिवादन कार्यक्रम व २२ एप्रिल रोजी भव्य जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कार्यक्रमाचे नियोजन करून त्याची जबाबदारी गावातील सहा युवकांवर सोपविण्यात आली होती.

नियोजनानुसार १४ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान कार्यक्रम सुरू असताना, चंद्रपूरहून आलेले सुबोध चिकटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक कार्यक्रमात हस्तक्षेप करून गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. आयोजकांना धमकावणे, माईक हिसकावून घेणे तसेच उपस्थितांवर धावून जाणे असे प्रकार यावेळी घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गोंधळादरम्यान अमोल महेंद्र निखाडे या युवकाची कॉलर पकडून मारहाण करण्यात आली. तसेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. प्रकरण अधिक चिघळल्याने संबंधितांनी लाकडी काठी घेऊन पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न केल्याचेही सांगण्यात आले. काही काळ परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली होती. मात्र, कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

तक्रारीत गंभीर आरोप करत संबंधित आरोपी आमदार देवराव दादा भोंगळे तसेच स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून समाजात दहशत व दडपशाही निर्माण करत असल्याचे म्हटले आहे. “तुम्ही फक्त भिमजयंती करून दाखवा” अशा स्वरूपाच्या उघड धमक्या दिल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे. या प्रकरणी जयंती उत्सव समितीच्या वतीने जिवती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत १४ एप्रिल रोजी उशिरा सुबोध चिकटे व सुमेध चिकटे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९६, ११५(२), ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेनंतर येल्लापूरमध्ये तणावपूर्ण शांतता असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. २२ एप्रिल रोजी होणाऱ्या भिम जयंतीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधितांवर जयंतीपूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी उत्सव समिती व नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा बौद्ध समाज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी समाजकंटकांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!