Home चंद्रपूर “रक्तातून मानवतेची ज्योत प्रज्वलित” — डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीत राजुरात...

“रक्तातून मानवतेची ज्योत प्रज्वलित” — डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीत राजुरात ६० रक्तदात्यांची जीवनदायी मानवंदना ⚫नागवंश युथ फोर्सची ९ वर्षांची परंपरा कायम; वैद्यकीय पथक व कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून समाजासमोर आदर्श

0
412

“रक्तातून मानवतेची ज्योत प्रज्वलित” — डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीत राजुरात ६० रक्तदात्यांची जीवनदायी मानवंदना

 

नागवंश युथ फोर्सची ९ वर्षांची परंपरा कायम; वैद्यकीय पथक व कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून समाजासमोर आदर्श

राजुरा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजुरा शहरात केवळ औपचारिक कार्यक्रम न होता, समाजजागृतीचा आणि मानवतेचा जिवंत संदेश देणारा उपक्रम साकारला गेला. नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था, राजुरा यांच्या वतीने संविधान चौक येथील गट साधन केंद्र सभागृहात आयोजित ९ व्या भव्य रक्तदान शिबिरात ६० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत अनेकांना जीवनदान देण्याचे कार्य केले.

डॉ. आंबेडकर जयंती म्हणजे केवळ मिरवणुका नव्हे, तर विचारांना कृतीत उतरवण्याचा दिवस, याची प्रचिती या उपक्रमातून आली. ज्येष्ठ कवी वामन दादा कर्डक यांच्या “उद्धरली कोटी कुळे…” या ओळींनी प्रेरित होऊन रक्तदानासारख्या सर्वोच्च मानवसेवेचा मार्ग निवडण्यात आला. तसेच कवी रमेश दादा बुरबुरे यांच्या संविधानविषयक ओळींनी या उपक्रमाला विचारांची भक्कम जोड दिली.

आजही रक्ताअभावी अनेकांचे प्राण धोक्यात येतात, ही वस्तुस्थिती लक्षात घेता तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या विचाराला कृतीत उतरवत या शिबिराने समाजात माणुसकीची जाणीव दृढ केली.

या शिबिरासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, रक्त संक्रमण सेवा विभाग, चंद्रपूर यांच्या वैद्यकीय पथकाने सुरक्षित रक्तसंकलन केले. यामध्ये डॉ. विशाल सिसोदिया, योगिता माळी (PRO), गायत्री पाटील, रुपेश डहाळे, शुभम कांबळे, प्रशिक मेश्राम, शुभम लहाने, एस. गोवर्धन (स्टाफ नर्स), सावन डोंगरे, विपीन कोडापे, देवेंद्र कोल्हे यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष अमोल ज.स. राऊत, सचिव धनराज नागोराव उमरे, उपाध्यक्ष रविकिरण बावणे, सहसचिव सुरेंद्र फूसाटे, कोषाध्यक्ष जयवर्धन खोब्रागडे तसेच सदस्य नूतन ब्राह्मणे, नितीन कांबळे, शैलेश भरणे, प्रयास कान्हेकर, गौतम देवगडे, के.पी. झाडे, राहुल अंबादे, युवराज कातकर, कपिल नळे, मनोज धोंगळे, सागर चहांदे, प्रमोद देठे,कोमल फूसाटे,आकाश नळे, रवी झाडे यांनी मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमानंतर अध्यक्ष अमोल राऊत यांनी सर्वांचे आभार मानत, “रक्तदान ही केवळ जबाबदारी नसून माणुसकी जपण्याची चळवळ आहे,” असे सांगितले.

या निमित्ताने एक महत्त्वाचा संदेश अधोरेखित झाला — रक्तदान ही कुणा एकाची जबाबदारी नसून प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे.समाजात माणुसकीची बीजे रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा झालेला हा उपक्रम म्हणजे त्यांच्या विचारांना दिलेली खरी मानवंदना ठरली.जर अशीच रक्तदान चळवळ समाजात वाढली, तर “रक्ताअभावी एकही जीव जाऊ नये” हा संकल्प निश्चितच साकार होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!