Home गडचिरोली गडचिरोलीत शेतीला ड्रोनची साथ ; जिल्हा परिषदेचा पथदर्शी उपक्रम

गडचिरोलीत शेतीला ड्रोनची साथ ; जिल्हा परिषदेचा पथदर्शी उपक्रम

0
66

गडचिरोलीत शेतीला ड्रोनची साथ ; जिल्हा परिषदेचा पथदर्शी उपक्रम

खते व कीटनाशकांची अचूक फवारणी ; हायटेक शेतीला चालना

गडचिरोली, सुखसागर झाडे 
गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत जिल्हा परिषद कृषी विभागाने ‘कृषी ड्रोन’च्या माध्यमातून खते व कीडनाशकांच्या फवारणीचा पथदर्शी उपक्रम सुरू केला आहे. दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवून शेती अधिक कार्यक्षम व सुरक्षित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली हा नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहे.

उपक्रमाची वैशिष्ट्ये

• शेतकरी गटांना प्राधान्य : जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) व महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान व तांत्रिक सहकार्य
• ड्रोन पायलट प्रशिक्षण : स्थानिक युवक व महिला बचत गटांना ‘ड्रोन पायलट’ म्हणून प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मिती
• मुख्य पिकांवर लक्ष : भात पिकावरील ‘तुडतुडा’ (प्रमुख कीड) व इतर रोग नियंत्रणासाठी प्रभावी फवारणी
• दुर्गम भागात सेवा : जिथे शेतात जाणे कठीण आहे अशा भागात ‘फिरते ड्रोन केंद्र’ शेतकऱ्यांच्या बांधावर सेवा देणार

पारंपरिक फवारणी पद्धतीत पाण्याचा व औषधांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. मात्र, ड्रोन तंत्रज्ञानामुळे सुमारे ९० टक्के पाण्याची बचत आणि २५ टक्के औषधांची बचत होणार असून फवारणी अधिक अचूक व प्रभावी होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांना होणारे फायदे

• मजुरांच्या टंचाईवर प्रभावी उपाय
• कमी खर्चात अधिक क्षेत्रात जलद फवारणी
• विषारी औषधांच्या संपर्कामुळे होणाऱ्या अपघातांपासून संरक्षण
• उत्पादनक्षमता वाढीस मदत

हायटेक शेतीला चालना – सुहास गाडे

कृषी ड्रोनच्या या आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यात हायटेक शेतीला चालना मिळेल. शेती अधिक आधुनिक, सुरक्षित व कार्यक्षम बनण्यास मदत होईल व दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम परिवर्तनकारी ठरेल तसेच महिला बचत गटांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.

गडचिरोली जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये दोन महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात आले असून त्यांना ड्रोन चालकाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्रात आधुनिकतेची नवी दिशा मिळत आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!