Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात १२ लाखांचा दारूसाठा जप्त ; तस्कर फरार…

गडचिरोली जिल्ह्यात १२ लाखांचा दारूसाठा जप्त ; तस्कर फरार…

0
84

गडचिरोली जिल्ह्यात १२ लाखांचा दारूसाठा जप्त ; तस्कर फरार…

 

गडचिरोली, सुखसागर झाडे
१ मार्च :- दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी आज कारवाई करत सुमारे १२ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अजय चिचघरे (रा. खरपुंडी, ता. जि. गडचिरोली) हा आपल्या साथीदारासह चारचाकी वाहन (क्र. यू.पी. १६ डी.बी. ०५९०) द्वारे पोटेगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करून चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा करणार होता. या माहितीनंतर पोलिसांनी नवरगाव येथे दोन पंचांसमक्ष सापळा रचला.
दरम्यान, संशयित वाहन दिसताच पोलिसांनी ते थांबविण्याचा इशारा केला. मात्र चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून त्यातील दोन व्यक्ती अंधारात पळून गेले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा साठा आढळून आला.
जप्त केलेल्या मुद्देमालात बिअरच्या १८० एमएल क्षमतेच्या १०५६ बाटल्या (अंदाजे किंमत ३,१६,८०० रुपये), ९० एमएलच्या १०० बाटल्या (१५ हजार रुपये), १ लिटरच्या २३ बाटल्या (४६ हजार रुपये), तसेच ५०० एमएलच्या १४४ टिन (४३,२०० रुपये) यांचा समावेश आहे. याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले टाटा कंपनीचे चारचाकी वाहन (अंदाजे किंमत ८ लाख रुपये) जप्त करण्यात आले. एकूण जप्तीची किंमत १२ लाख २१ हजार रुपये आहे.
या प्रकरणी अजय चिचघरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सीमा किंकर करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधीरा व अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पार पडली.
रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दारूतस्करांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!