चालत्या रुग्णवाहिकेने घेतला पेट…
भर रस्त्यावर रुग्णवाहिका जळून खाक, सुदैवाने जिवितहानी टळली
चामोर्शी l सुखसागर झाडे
आज सकाळी १० वाजेच्या सुमारास दोटकुली- वाघोली रस्त्यावर चालत्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागली. हि रुग्णवाहिका माजी पंचायत समिती सदस्य तथा विद्यमान तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य कविताताई प्रमोद भगत यांच्या नेतृत्वाखाली २४ तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली रुग्णवाहिका आज दुर्दैवी घटनेत पूर्णतः जळून खाक झाली.
याच रुग्णवाहिका द्वारे मागील अनेक वर्षांपासुन शेकडो रुग्णांना सेवा देत देवदूत ठरली होती.
नागपूर, सेवाग्रामसह विविध नामांकित रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता रुग्णांना वेळेत पोहोचवून उपचार मिळवून देण्याचे मोलाचे कार्य या रुग्णवाहिकेमार्फत करण्यात येत होते. हि रुग्णवाहिका जनतेला २४ तास निस्वार्थ सेवा देण्यात धावत राहिली आणि अनेक रुग्णांचे प्राण वाचवले.
आज वाघोली येथील रुग्णाला आणण्यासाठी जात असताना दोटकुली व वाघोली भर रस्त्यावर चालत्या गाडीतून धुर निघायला लागला दरम्यान अचानक रुग्णवाहिकेला आग लागली. वाहनातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर उडी घेतली. सुदैवाने त्या वेळी रुग्णवाहिकेत कोणताही रुग्ण नसल्याने जीवितहानी टळली, मात्र काही क्षणांतच संपूर्ण रुग्णवाहिका आगीच्या लहरी भडक्यात येत पेटुन खाक झाली.
ही रुग्णवाहिका केवळ एक वाहन नव्हते, तर ग्रामीण भागातील गरिबांसाठी आशेचा आधार होते. प्रमोद भगत व कविताताई भगत यांनी आपल्या कार्यकाळात ही सेवा अखंड सुरू ठेवत समाजसेवेचा आदर्श निर्माण केला होता.
आज अचानक आलेल्या बिघाडामुळे रुग्णवाहिका पेट घेऊन नष्ट झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
दोटकुली, वाघोलीसह संपूर्ण परिसरात या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून, “शेकडो जीव वाचवणारी आमची रुग्णवाहिका आज हरपली,” अशा भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी तातडीने नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी आता जनतेतून होत आहे.









