Home चंद्रपूर “बालमजुरी बंद करा, बालहक्क वाचवा” घोषणांनी चंद्रपूर दणाणले; रुदय संस्थेची जनजागृती रॅली

“बालमजुरी बंद करा, बालहक्क वाचवा” घोषणांनी चंद्रपूर दणाणले; रुदय संस्थेची जनजागृती रॅली

0
27

“बालमजुरी बंद करा, बालहक्क वाचवा” घोषणांनी चंद्रपूर दणाणले; रुदय संस्थेची जनजागृती रॅली

चंद्रपूर : जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही संपूर्ण भारतात बालहक्कांसाठी काम करणारी सामाजिक संस्था असून त्यांच्या ‘ॲक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन’ प्रकल्पांतर्गत रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन (रुदय), गडचिरोली ही संस्था चंद्रपूर जिल्ह्यात बालविवाह, बालकांवरील लैंगिक अत्याचार, बालमजुरी व बाल तस्करी प्रतिबंधासाठी मागील तीन वर्षांपासून कार्यरत आहे. जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त १२ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत रुदय सामाजिक संस्था गडचिरोली यांचे विद्यमाने व महिला व बाल विकास विभाग, बाल कल्याण समिती, कामगार आयुक्त, विधीसेवा प्राधिकरण, चाईल्ड हेल्प लाईन चंद्रपूर व पोलीस विभाग चंद्रपूर यांचे संयुक्त सहकार्याने “बालमजुरीमुक्त अभियान” राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून आज गांधी चौक ते जटपुरा गेट दरम्यान भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. काशिनाथ देवगडे, संस्थापक, रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन (रुदय), गडचिरोली होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सुधीर इंगळे, माननीय न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून सौ. मीनाक्षी भस्मे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर, सौ. क्षमा बासरकर, अध्यक्षा, बाल कल्याण समिती, चंद्रपूर, डॉ. ज्योत्स्ना मोहितकर सदस्य, बाल कल्याण समिती, चंद्रपूर, श्री. अजय साखरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPU)चंद्रपूर, डॉ. शेंडे, कामगार अधिकारी , चंद्रपूर; श्री. अजय काकतकर वरिष्ठ दुकाणे निरीक्षक, चंद्रपूर, प्रा. डॉ. किरणकुमार मनुरे, समाजकार्य महाविद्यालय, पडोली चंद्रपूर, पी.एस.आय खाडे व ए.एस.आय मेश्राम, शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन (रुदय), गडचिरोलीचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. प्रेम जरपोतवार यांनी केले. त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा देताना सांगितले की, रुदय संस्था गेल्या तीन वर्षांपासून बालमजुरी, बाल तस्करी, बालविवाह व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध आणि बालहक्क संरक्षण या विषयांवर सातत्याने कार्यरत आहे. जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त संपूर्ण जून महिन्यात ‘बालमजुरीमुक्त अभियान’ राबविण्यात येत असून जनजागृती कार्यक्रम, रॅली, स्वाक्षरी अभियान, धाडसत्रे व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानात नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था व शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सौ. क्षमा बासरकर यांनी अभियानाला शुभेच्छा देत बालहक्क संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यानंतर बालमजुरीमुक्त स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याची प्रतिज्ञा करत स्वाक्षऱ्या केल्या. तसेच बालमजुरी निर्मूलनासाठी सर्वांनी शपथ घेतली.

अध्यक्षीय भाषणात रुदय संस्थेचे संस्थापक तथा संचालक श्री. काशिनाथ देवगडे यांनी बालमजुरीमुळे अनेक मुलांचे बालपण हिरावले जात असून त्यांच्या हातात पुस्तकांऐवजी मजुरीची साधने दिसत असल्याची खंत व्यक्त केली. बालमजुरी निर्मूलनासाठी शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था व समाजाने एकत्रितपणे कार्य करून बालमजुरीमुक्त अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सौ. मीनाक्षी भस्मे आणि माननीय न्यायाधीश श्री. सुधीर इंगळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृती रॅलीला प्रारंभ करण्यात आला. गांधी चौक ते जटपुरा गेट या मार्गावर काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान “बालमजुरी बंद करा”, “बालहक्क वाचवा”, “शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व जेटपुरा गेट रॅली समापणात आभार प्रदर्शन क्षेत्रीय अधिकारी श्री. शशिकांत मोकाशे यांनी केले. कार्यक्रमाला डीसीपीयू युनिट, बाल कल्याण समिती, चाईल्ड लाईन 1098, महिला व बाल विकास विभाग, शहर पोलीस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन, समाजकार्य महाविद्यालय पडोली, चंद्रपूर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रश्मी भोयर, सोनम लाटकर, संजय खामणकर, संजना रामटेके व ॲड. अक्षय गेडाम यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!