Home गडचिरोली एसटीचा भोंगळ कारभार उघड: गावांची अदलाबदल, प्रवाशांची दिशाभूल आणि आर्थिक लुटीची शंका…

एसटीचा भोंगळ कारभार उघड: गावांची अदलाबदल, प्रवाशांची दिशाभूल आणि आर्थिक लुटीची शंका…

0
40

एसटीचा भोंगळ कारभार उघड: गावांची अदलाबदल, प्रवाशांची दिशाभूल आणि आर्थिक लुटीची शंका…

 

गडचिरोली, सुखसागर झाडे :-जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात एसटी महामंडळाच्या कारभारातील गंभीर त्रुटी समोर आल्या असून, देलोडा आणि डारली या दोन गावांच्या नावांमध्ये झालेल्या गोंधळामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या दोन गावांमधील अंतर साधारण 8 ते 10 किलोमीटर असताना, तिकीट मशीनमध्येच गावांची नावे चुकीच्या पद्धतीने सेट केल्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

तिकीटात गावांची उलटापालट झाली…

 

प्रवाशाने “देलोडा”साठी तिकीट मागितल्यास त्याला “गडचिरोली ते डारली” असे तिकीट दिले जाते, तर “डारली”साठी तिकीट घेणाऱ्यांना “गडचिरोली ते देलोडा” असे छापलेले तिकीट मिळते. या चुकीमुळे प्रवाशांना जास्त भाडे आकारले जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. परिणामी, रोजच कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद निर्माण होत आहेत.

 

कंडक्टरची ‘तांत्रिक’ कारणे, प्रवाशांचा संताप…

 

या संदर्भात कंडक्टरकडून “तिकीट मशीनमध्ये आधीपासूनच असे सेटिंग आहे, आम्ही काही करू शकत नाही” असे उत्तर दिले जाते. मात्र, प्रवाशांचे म्हणणे आहे की, जर चूक लक्षात आली आहे, तर ती दुरुस्त करण्यासाठी संबंधित यंत्रणा का पुढाकार घेत नाही? ही चूक जाणूनबुजून कायम ठेवून प्रवाशांची लूट केली जात असल्याचा गंभीर आरोपही काही प्रवाशांनी केला आहे.

 

बस पाट्यांमुळेही दिशाभूल होतेय….

 

गोंधळ इथेच थांबत नाही. बसच्या फलाटावर लावण्यात येणाऱ्या पाट्यांवर दर्शवलेला मार्ग आणि प्रत्यक्ष बस धावणारा मार्ग यात मोठा फरक दिसून येतो. उदाहरणार्थ, “गडचिरोली–देलोडा” अशी पाटी असलेली बस प्रत्यक्षात गोगाव, साखरा, काटली, पोर्ला, देलोडा या मार्गाने न जाता खरपुंडी, आंबेशिवणी, वडधा, डारली, वैरागड, आरमोरी या वेगळ्याच मार्गाने धावत असल्याचे समोर आले आहे.

 

यामुळे पाटी पाहून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना मधेच उतरवून दुसरी बस पकडण्यास सांगितले जाते. अशा प्रकारामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, त्यांना वेळ आणि पैशाचा दुहेरी फटका बसत आहे.

 

प्रवाशांमध्ये संभ्रम आणि अविश्वास निर्माण….

 

या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. “डोळ्यांवर विश्वास ठेवावा की कंडक्टरच्या बोलण्यावर?” असा प्रश्न सामान्य प्रवाशांना पडत आहे. पूर्वी “गडचिरोली–डारली–आरमोरी” आणि “गडचिरोली–पोर्ला–रांगी” असे स्पष्ट मार्ग असताना, आता या मार्गांमध्ये झालेल्या बदलांमुळे प्रवास अधिकच गोंधळात टाकणारा ठरत आहे.

 

तातडीने दुरुस्तीची करण्याची मागणी…

 

या पार्श्वभूमीवर, तिकीट मशीनमध्ये सेट करण्यात आलेल्या गावांच्या नावांची क्रमवारी तातडीने दुरुस्त करावी, तसेच बसवरील पाट्यांवर योग्य मार्ग आणि गावांची नावे स्पष्टपणे नमूद करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे.

 

अन्यथा, प्रवाशांचा विश्वास ढासळण्यासोबतच एसटी महामंडळाच्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!