Home चंद्रपूर लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशन, मार्फत आयोजित भाजीपाला व फळे मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात...

लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशन, मार्फत आयोजित भाजीपाला व फळे मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

0
20

लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशन, मार्फत आयोजित भाजीपाला व फळे मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न
मुरसा : लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशन अंतर्गत येणाऱ्या शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथे दिनांक २२ एप्रिल रोजी महिलांसाठी भाजीपाला व फळे मूल्यवर्धन विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये महिलांना टोमॅटो केचप आणि मिक्स फ्रूट जॅम हे पदार्थ शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे तयार करायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक याद्वारे या पदार्थांची निर्मिती करून दाखवण्यात आली. ग्रामीण भागातील महिलांना पूरक उद्योगाची माहिती मिळावी, स्वावलंबनाची चालना मिळावी तसेच शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये शेतकरी प्रशिक्षण केंद्र मुरसा येथील व्यवस्थापक डॉ. आदित्य कदम यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करत मिक्स फ्रूट जॅम व टोमॅटो केचप तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सविस्तरपणे समजावून सांगितले. त्यांनी फळांची निवड, स्वच्छता, कापणी, गर तयार करणे, उकळण्याची योग्य पद्धत, साखर व इतर घटकांचे प्रमाण, टिकवणूक तंत्र तसेच तयार उत्पादनाची गुणवत्ता राखणे यावर विशेष भर दिला. मिक्स फ्रूट जॅम तयार करताना विविध फळांचे संतुलित प्रमाण, चव व घट्टपणा टिकवण्याच्या पद्धती यांचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच टोमॅटो केचअप तयार करताना पिकलेल्या टोमॅटोची निवड, प्युरी तयार करणे, मसाल्यांचे अचूक प्रमाण, शिजवण्याची प्रक्रिया व साठवणूक याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आपल्या मार्गदर्शनात डॉ. आदित्य कदम यांनी विविध फळे व भाजीपाल्यापासून तयार करता येणारे मूल्यवर्धित पदार्थ, त्यांचे आरोग्यदायी गुणधर्म तसेच बाजारपेठेतील मागणी याबाबत सखोल माहिती दिली.
सदर प्रशिक्षण कार्यशाळेला श्री. प्रशांत पुरी (वरिष्ठ उपाध्यक्ष, लॉयड्स मेटल अँड एनर्जी लि.) तसेच डॉ. विद्या पाल सहाय्यक महाव्यवस्थापक, (लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशन) उपस्थित होते. महिलांना मार्गदर्शन करताना लॉयड्स मेटल अँड एनर्जी लि. आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे तसेच उद्योगाच्या दिशेने पुढे यावे, असे आवाहन यावेळी श्री. प्रशांत पुरी यांनी केले.
या प्रशिक्षण कार्यशाळेत नकोडा, पांढरकवडा, मुरसा, बेलसणी, वढा, शेणगाव, उसगाव या विविध गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण ८२ महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
या प्रशिक्षणाचे आयोजन शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथील डॉ. महेंद्र वैरागडे, (वरिष्ठ अधिकारी), श्री. मानस मकासरे (कनिष्ठ अधिकारी) तसेच श्री. आदित्य मोहितकर, श्री. धनंजय पिंपळशेंडे आणि श्री. अभिजीत चौधरी (तांत्रिक सहाय्यक) यांनी केले.
प्रशिक्षणादरम्यान महिलांनी स्वतः तयार केलेल्या टोमॅटो केचप व जॅमचा आस्वाद घेतला आणि त्याबद्दल समाधान व्यक्त केले. सहभागी महिलांनी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगत भविष्यात अशा प्रकारच्या अधिक प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!