गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गॅस सिलेंडर चा तुटवडा मुळीच नाही…
संभ्रम निर्माण करीत ग्राहकांकडून अनावश्यक बुकिंग सुरु असल्यामुळे एजन्सी ची तारांबळ
गडचिरोली, सुखसागर झाडे :– विधानसभा मतदारसंघातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व गॅस एजन्सी धारकांसोबत आमदार डॉ मिलिंदजी नरोटे यांनी आढावा बैठक घेतली .
बैठकीत असे निदर्शनास आले की गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये एलपीजी सिलेंडरचा नियमित पुरवठा सुरू असून कुठल्याही प्रकारची वास्तविक टंचाई नाही. मात्र काही ग्राहकांकडून आवश्यकतेपेक्षा जवळपास तिप्पट प्रमाणात सिलेंडरची नोंदणी (बुकिंग) करण्यात येत असल्यामुळे पुरवठा यंत्रणेवर अनावश्यक ताण निर्माण होत आहे आणि त्यामुळे तात्पुरती टंचाई असल्याचा भास निर्माण होत आहे.
सर्व गॅस एजन्सींकडे एलपीजी सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे गडचिरोली विधानसभा मतदारसंघात तसेच देशभरात एलपीजीची कोणतीही टंचाई नाही.
आमदार डॉ नरोटे यांनी मतदारसंघातील सर्व गॅस ग्राहकांना नम्र विनंती केली आहे की, कृपया अनावश्यक किंवा घाईघाईने बुकिंग करू नये. आपल्या गरजेनुसार जसे आपण नियमित सिलेंडरची नोंदणी करता तसेच बुकिंग करावे, जेणेकरून सर्वांना वेळेवर सिलेंडर उपलब्ध होण्यास मदत होईल.
व्यावसायिक (Commercial) गॅस सिलेंडरबाबत शासनाचे धोरण प्रसिद्ध झाले असून येत्या दोन ते तीन दिवसांत नोंदणीकृत व्यावसायिक ग्राहकांना शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणानुसार नियमित सिलेंडर उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे या संदर्भातील निर्माण झालेल्या अडचणी लवकरच दूर होतील अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सर्व गॅस एजन्सी मालक तसेच पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









