आर. आर. आबा सुंदर गाव स्पर्धा – स्मार्ट ग्राम तपासणी : गौरीपूर व सोनापूर
चामोर्शी, सुखसागर झाडे :- तालुक्यातील आज स्मार्ट ग्राम उपक्रमांतर्गत गौरीपूर व सोनापूर ग्रामपंचायतींना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर तपासणी केली असता यावेळी ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, ऑपरेटर, रोजगार सेवक, आशा, अंगणवाडी सेविका, ग्राम सखी, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायतीतील नमुना क्र. 1 ते 33 तसेच सर्व दप्तर अद्यावत व सुस्थितीत आढळले. विविध शासन योजनांची उद्दिष्टपूर्ती समाधानकारकरीत्या होत असल्याची खात्री करण्यात आली.
अंगणवाडी तपासणी
अंगणवाडीत मॅम व इतर बालकांचे वजन व उंची मोजून पडताळणी करण्यात आली. ऑनलाइन पोषण ट्रॅकर उपलब्ध नसल्याने ऑफलाइन नोंदीशी पडताळणी केली असता सर्व मोजमापे अचूक आढळली. कुपोषित बालकांना विशेष आहार दिला जात असून त्यांना सर्वसाधारण प्रवर्गात आणण्यासाठी सेविकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
🤰माता व बाल आरोग्य
गर्भवती व पीएनसी मातांची भेट घेऊन प्रसूतीपूर्व तपासण्या, सोनोग्राफी व टी.डी. लसीकरण वेळेवर पूर्ण झाल्याची खात्री करण्यात आली. आशा, एएनएम, अंगणवाडी सेविका व CHO यांच्या नियमित भेटी होत असल्याच्या नोंदी समाधानकारक आढळल्या.
🏫 शाळा गुणवत्ता तपासणी
जि प.शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची वाचन, लेखन व गणित गुणवत्ता तपासली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा व चव उत्तम आढळली.
परिसर स्वच्छता व परसबाग
शाळा व अंगणवाडी परिसरातील परसबागेमध्ये विविध फळभाज्या, पालेभाज्या व फळझाडांची चांगल्या प्रकारे लागवड व जपणूक केलेली दिसून आली. ग्रामपंचायत मार्फत रंगकाम व विविध योजनांचे लोगो पेंट करून गाव सुशोभित करण्यात आले आहे. कचरा संकलन व विल्हेवाट बचत गटामार्फत प्रभावीपणे केली जात आहे.
☀️ इतर निरीक्षणे
ग्रामपंचायत व अंगणवाडी येथे बसवलेली सोलर यंत्रणा कार्यरत आढळली. गावातील शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था समाधानकारक असून ग्रामस्थ त्याचा लाभ घेत आहेत.
सदर पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत चौकशी व तपासणी करून आढावा घेतला असता ग्रामपंचायत सोनापूर व ग्रामपंचायत गौरीपूर उल्लेखनिय कामकाज दिसून आले.









