सर्वसुविधायुक्त सुरक्षित ‘कुर्मा घर’ उभारणीसाठी पाठपुरावा करणार – ॲड. धर्मपाल मेश्राम
गडचिरोली, सुखसागर झाडे : जिल्ह्यात आदिवासी समाजात मासिक पाळीच्या काळात महिलांना कुर्मा घरात ठेवण्याची प्रथा आहे मात्र अनेक ठिकाणी ही घरे अडगळीत, अस्वच्छ व मूलभूत सुविधांअभावी महिलांसाठी असुरक्षित ठरत असल्याची खंत व्यक्त करत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पिण्याचे पाणी, मजबूत छत, वीजपुरवठा व स्वयंपाकाची सुविधा असलेले किमान सर्वसुविधायुक्त व सुरक्षित कुर्मा घर उभारण्यासाठी आपण पुढाकार घेवू असे मत व्यक्त केले.
ॲङ मेश्राम यांनी नुकतेच गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील सिता-टोला या आदिवासी गावाला भेट देवून पारंपरिक ‘कुर्मा घर’ तसेच ‘मावा आस्काना लोण’ (आपल्या हक्काचे घर) या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या नव्या घरांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक प्रथा, सामाजिक परिस्थिती आणि महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित मुद्द्यांवर ग्रामस्थांशी संवाद साधत आढावा घेतला.
यावेळी आदिवासी समाजात मासिक पाळीच्या काळात महिलांना स्वतंत्र ‘कुर्मा घरात’ ठेवण्याची पारंपरिक प्रथा आजही सुरू असल्याचे निदर्शनास आले.
अनेक ठिकाणी ही कुर्मा घरे अडगळीत, अस्वच्छ आणि आवश्यक मूलभूत सुविधांअभावी असल्याने महिलांच्या आरोग्य व सुरक्षिततेस धोका निर्माण होत असल्याची बाब त्यांनी गांभीर्याने घेतली. अशा परिस्थितीत महिलांना सन्मानपूर्वक व सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुर्मा घरांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, मजबूत छप्पर, वीजपुरवठा, स्वच्छता व्यवस्था तसेच स्वयंपाकासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे सांगत, किमान सर्वसुविधायुक्त व सुरक्षित कुर्मा घर उभारणीसाठी पुढाकार घेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. पारंपरिक प्रथांचा आदर राखत महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि सुरक्षिततेचा विचार करून सकारात्मक बदल घडवून आणण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी स्थानिक महिलांनी सुरक्षीत कुर्मा घरांची आवश्यकता नमुद केली.









