लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचा — रोजगाराभिमुख उपक्रम एचएमव्ही प्रशिक्षणासाठी पाठविले १७ विद्यार्थी
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करून स्वावलंबी बनविण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनने आणखी एक मोलाचा समाजोपयोगी उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील १७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना एचएमव्ही (हेवी मोटर व्हेईकल) ड्रायव्हिंग प्रशिक्षणासाठी छिंदवाडा येथील अशोक लेलँड ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.
या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना भारी वाहन चालविण्याचे तांत्रिक कौशल्य, रस्ते सुरक्षा नियम, वाहतुकीचे कायदे, वाहनांची दैनंदिन तपासणी व देखभाल, तसेच वास्तविक रस्त्यावरील परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचे मार्गदर्शन तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून दिले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज अशा दर्जेदार प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची व्यावसायिक क्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध कौशल्यवर्धक प्रकल्प राबविले जात आहेत. एचएमव्ही ड्रायव्हिंग प्रशिक्षण हा त्यापैकी एक महत्त्वाचा प्रकल्प असून, याद्वारे अनेक युवकांना वाहनचालक म्हणून नोकरीची संधी मिळत आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल तसेच ग्रामीण भागातील रोजगार वाढीसही चालना मिळेल, असा विश्वास फाउंडेशनकडून व्यक्त करण्यात आला आहे.
या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून, रोजगारनिर्मितीची ही उत्तम संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी लॉयड्स समूहाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांनी भविष्यात कौशल्यांचा उपयोग करून समाजाच्या आणि स्वतःच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.
लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचा हा उपक्रम रोजगाराभिमुख उपक्रमांची एक सकारात्मक दिशा ठरत असून, पुढील काळात अधिकाधिक युवकांना अशा प्रकारच्या प्रशिक्षणाद्वारे स्वावलंबी करण्याचे ध्येय फाउंडेशनने मांडले आहे.







