Home गडचिरोली नवेगाव माल येथे मानसिक आरोग्य दिन साजरा

नवेगाव माल येथे मानसिक आरोग्य दिन साजरा

0
108

नवेगाव माल येथे मानसिक आरोग्य दिन साजरा

मानसिक आजाराबद्दल मान्यवरांनी ग्रामस्थांना केले मोलाचे मार्गदर्शन

 

चामोर्शी, सुखसागर झाडे

चामोर्शी तालुक्यातील नवेगाव माल येथे आरोग्य वर्धीनी उपकेंद्रामध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करून मानसिक आरोग्य दिन साजरा केला जात असतो.
ममता हेल्थ इन्स्टिट्यूट फॉर मदर अँड चाईल्ड (जागृती प्रकल्प) गडचिरोली तथा जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नवेगाव माल यांच्या सहकार्याने नवेगाव माल येथे ‘ मानसिक आरोग्य जनजागृती ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.सोमलता चौधरी सरपंच ग्रा.पं. नवेगाव माल, प्रमुख मार्गदर्शक मा. केशव होळंबे सर समुपदेशक सायकॉलॉजिस्ट जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली , मा. नागपुरे सर वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक गडचिरोली , मा.वैभव चांडोले सर वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक गडचिरोली , मा. प्रतीक अवथरे जिल्हा समन्वयक ममता हेल्थ इन्स्टिट्यूट फॉर मदर अँड चाईल्ड गडचिरोली तसेच प्रमुख अतिथी उपसरपंच .चरणदास चौधरी, मिनाक्षी दुर्योधन CHO उपकेंद्र नवेगाव माल उपस्थित होते.
प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक मा. केशव होळंबे सर यांनी महिलांना गर्भधारणा आणि बाळाला जन्म देण्याची तयारी हा एक रोमांचक काळ असतोच पण त्याचबरोबर एक आव्हानात्मक देखील असतो. या वेळी तुम्हाला काही भावनिक बदल जाणवला तर आश्चर्यचकित होऊ नका.पुढे काय होणार आहे याबद्दल काही चिंता आणि भीती असणे सामान्य आहे . तुम्हाला खूप ताणतणाव जाणवू शकतो, विशेषतः कारण तुम्हाला माहिती आहे की हा एक मोठा बदल आहे ज्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयारी करू शकत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. याकरिता महिलांनी मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे तसेच अगोदरच्या काळात होणारे बाळंतपण आणि सध्याच्या काळात होणारे बाळंतपण या बद्दल महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री. नागपुरे सर यांनी मानसिक आजार म्हणजे काय , त्याची लक्षणे काय आहेत किंवा असे काही लक्षण आपल्यात आढळून आल्यास काय करावे तसेच आपल्याला पुरेशी झोप , व्यायाम करणे, इतरांशी संवाद साधणे,बोलणे व सतत चिंता त्रासदायक वाटू लागल्यास मनोचिकित्सक समुपदेशकांकडून सल्ला घ्यायला सांगितले तर वैभव चांडोले सर यांनी मानसिक आजार काय आहे आणि हा आजार कोणाला होऊ शकतो, कोणते मानसिक आजार आहेत,त्याचे प्रकार याबद्दल माहिती दिली. तसेच प्रतीक अवथरे सर जिल्हा समन्वयक यांनी महिलांमधील व्यसनाधिनता याबद्दल सविस्तर माहिती दिली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ग्रामीण भागातील महिलांमध्ये व्यसनाचं प्रमाण खूप जास्त वाढलेला दिसून येतो आहे. व्यसनामुळे कामात मन न लागणे , भूक न लागणे , जास्त चिडचिड होणे, झोप न लागणे तसेच गरोदर महिलांना व्यसनापासून दूर राहण्यास सांगितले कारण आपण व्यसन केल्यामुळे आपल्या होणाऱ्या बाळावर त्याचा वाईट परिणाम होतो अशा प्रकारे व्यसनामुळे होणाऱ्या परिणामावर सविस्तर मार्गदर्शन केले.
तर दुर्योधन मॅडम यांनी मानसिक आजार हे भावनिक, सामाजिक आणि कौटुंबिक अशा वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकतो याबद्दल माहिती दिली.
सदर कार्यक्रमाला उपस्थित श्री.सुमित रामटेके ममता हेल्थ इन्स्टिट्यूट फॉर मदर अँड चाईल्ड गडचिरोली चामोर्शी तालुका पर्यवेक्षक, सदर कार्यक्रमाचे संचलन पंकज डायकी यांनी केले तर आभार रंजना तालेवार यांनी व्यक्त केले तसेच प्राजक्ता चौखुंडे,आरोग्य कर्मचारी, आशा सेविका,अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील आणि ग्रामस्थांच्या सहकाऱ्यांने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!