ताडगांव जंगल परिसरातुन एक जहाल माओवादी अटकेत…
जहाल माओवादी हा भामरागड दलमचा सक्रिय सदस्य
गडचिरोली, सुखसागर झाडे : ताडगाव जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने कारवाई करीत असलेल्या एका जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. सदर जहाल माओवादी याच्यावर खून, जाळपोळ आणि भुसुरुंग स्फोटासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
काल (दि. 13 सप्टेंबर) भामरागड उपविभागातील तिरकामेटा जंगल परिसरात विशेष अभियान पथक गस्त घालत असताना एक संशयित इसम पोलिसांना दिसून आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती त्याची ओळख शंकर भिमा महाका (वय 32, रा. परायनार, ता. भामरागड, जि. गडचिरोली) अशी त्याची ओळख पटली असून तो भामरागड दलमचा सक्रिय सदस्य असल्याचे स्पष्ट झाले.
महाकावर 2022 मध्ये धोडराज-इरपनार मार्गावरील पेनगुंडा रस्त्याच्या कामावर असलेल्या 19 वाहनांची जाळपोळ, 2023 मध्ये पेनगुंडा येथील एका निरपराध व्यक्तीचा खून यासह चार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
🔹 दलममधील कार्यकाळ
2016 ते 2021 : जनमिलीशिया पदावर कार्यरत
2021-22 पासून भामरागड दलममध्ये सदस्य
2022 पासून पोलिसांची माहिती गोळा करणे व विध्वंसक कारवायांमध्ये सहभाग
🔹 गुन्हे
जाळपोळ : 01 (2022, धोडराज परिसर)
खून : 01 (2023, पेनगुंडा)
इतर : 02
या कारवाईसंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, डीआयजी अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाने ही कारवाई केली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, “गडचिरोली पोलिसांचे माओवादीविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात येणार असून, माओवादी कार्यकर्त्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करून समाजमुखी जीवन जगावे,” असे आवाहन केले आहे.









