भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश!
▪️फेरफारासाठी १५ हजारांची लाच मागणारा भुकर मापक एसीबीच्या जाळ्यात; १० हजारांची रक्कम खासगी इसमामार्फत स्वीकारताना रंगेहात कारवाई
नागभीड प्रतिनिधी:दि. ५ जून २०२६ रोज शुक्रवारला
नागभीड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचाराचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून फेरफाराच्या कामासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या परिरक्षण भुकर मापकासह एका खासगी एजंटविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार आपल्या कुटुंबासह राहत असलेल्या घराची जागा त्यांच्या आजोबांच्या नावावर होती. आजोबांचे निधन झाल्यानंतर सदर जागेचा फेरफार त्यांच्या वडिलांच्या नावाने करण्यासाठी त्यांनी नागभीड येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज सादर केला होता. यावेळी कार्यालयातील परिरक्षण भुकर मापक रंजीत रामचंद्र कनोजकर यांनी फेरफाराची कार्यवाही करण्यासाठी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ४ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपी रंजीत कनोजकर यांनी तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर ५ जून रोजी एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान तक्रारदाराने आरोपी रंजीत कनोजकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सदर रक्कम जयंत दीपक कामडी (रा. तळोधी) या खासगी इसमाकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने जयंत कामडी याला १० हजार रुपये दिल्यानंतर त्याने ती रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर मुख्य आरोपी रंजीत रामचंद्र कनोजकर, परिरक्षण भुकर मापक, कार्यालय उपअधीक्षक भूमी अभिलेख, नागभीड यांनाही ताब्यात घेण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक व श्रीमती माधुरी बावीस्कर, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईमध्ये श्री. अनिल जिट्टावार (पोलीस उपअधीक्षक), सचिन धर्मेजवार (पोलीस निरीक्षक), पोहवा रविकुमार इंगळे, पोशि अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, सचिन गजभिये, म.पो.शि. मेघा मोहुर्ले, चापोशि/सतीश सिडाम (सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर) तसेच चापोशि/संदीप कौरासे (मो.प.वि. चंद्रपूर) यांनी सहभाग घेत कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
नागरिकांना एसीबीचे आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या एजंटकडून शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
या कारवाईमुळे भूमी अभिलेख विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.




