Home महाराष्ट्र समाज प्रबोधनासाठी ‘चलो मालेगाव’! – युवानेते अॅड.संदीप ताजने यांचे आवाहन

समाज प्रबोधनासाठी ‘चलो मालेगाव’! – युवानेते अॅड.संदीप ताजने यांचे आवाहन

0
134
समाज प्रबोधनासाठी ‘चलो मालेगाव’! – युवानेते अॅड.संदीप ताजने यांचे आवाहन

विशाल धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याचे आयोजन

आदर्श बुद्ध विहारांना मिळणार अष्टधातूंच्या बुद्ध मुर्तीचे दान


संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘चलो बुद्ध की ओर’ अभियानाअंतर्गत परित्राण बुद्धिस्ट फाउंडेशनच्या वतीने युवा नेते अॅड.संदीप ताजने यांच्या मार्गदर्शनात विशान धम्म चक्रप्रर्वतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील एमसीसी क्रिकेट मैदानावर आयोजित या सोहळ्यात हजारोंच्या संख्येत धम्मबांधव उपस्थित राहतील, अशी माहिती  फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे. सोहळ्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनासह  जिल्ह्यातील आदर्श बुद्ध विहारांना अष्ट धातुंच्या बुद्ध मुर्ती दान करण्यात येणार आहे.

सोहळ्यात श्रीलंकेतील डॉ.भदंत अग्गराहेरा कश्शप थेरो तसेच उपासिका आयुष्यमती कौसल्या विक्रमसिंघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. विशेष म्हणजे ‘व्हीआयपी राहण’ फेम साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांच्या समाजप्रबोधन आणि भीम गीत गायनाचा कार्यक्रम देखील यानिमित्ताने धम्मबांधवांसाठी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात माजी न्यायमूर्ती सी.एल.थूल, सिने अभिनेते गगन मलीक, भदंत पय्याबोद्धी थेरो,आंबेडकरी रॅपर विपीन तातड प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

धम्म चळवळ तसेच आंबेडकरी आंदोलनातील जेष्ठ नेते तसेच कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून विशेष सन्मानित करण्यात येईल.राज्यातील आंबेडकरी सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर्सला प्रशस्तीपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात धम्मदेसना देण्यात येईल. आयोजित कार्यक्रमात विदर्भातून हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

धम्मचक्रप्रवर्तन सोहळ्याचा मुख्य उद्देश समाजप्रबोधन, सामाजिक एकता आणि बौद्ध मूल्यांचा प्रसार हा आहे. समाजात विषमता, अंधश्रद्धा आणि द्वेषभावना वाढताना दिसतात. अशा वेळी भगवान बुद्धांच्या करुणा, प्रज्ञा आणि समत्वाच्या तत्त्वांचा प्रसार होणे ही काळाची गरज आहे. धम्म हे केवळ धार्मिक साधन नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे. या सोहळ्यातून सर्वसामान्यांना जागरूक करून त्यांना शिक्षण, नीतिमत्ता आणि संवेदनशीलतेच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे प्रतिपादन अॅड.संदीप ताजने यांनी केले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदर्श बुद्धविहारांना अष्टधातूंच्या बुद्धमूर्तींचे दान करण्यात येणार आहे. यामागचा हेतू केवळ धार्मिक नसून, बुद्धविहार हे समाजातील शिक्षण, संस्कार आणि प्रबोधनाचे केंद्र बनावेत हा आहे. बुद्धमूर्ती हे श्रद्धेचे प्रतीक आहे; परंतु त्यामागील तत्त्वज्ञान- म्हणजे करुणा, मैत्री आणि समता-हेच आम्ही प्रत्येक घराघरात पोहोचवू इच्छितो, अशी भावना अॅड.ताजने यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!