तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या! – प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा ची मागणी
कोरपना/प्रतिनिधी : मागील अनेक दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा येथे असलेली रुग्णवाहिकेत बिघाड असल्यामुळे रुग्णांना सेवा देण्यास वारंवार अडचण निर्माण होत आहे. रुग्णांना योग्य व तातडीने सेवा देण्यास रुग्णवाहिका आवश्यक असल्याने या आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेची दुरुस्ती करून उपलब्ध करून देण्याची मागणी करूनही दिरंगाई होत असल्याने आरोग्य सेवेत बाधा निर्माण होत आहे.
सध्या असलेल्या रुग्णवाहिकेत बिघाड असून ती दुरुस्ती करण्यासंदर्भात सदर आरोग्य केंद्रातर्फे वारंवार जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर व तालुका आरोग्य अधिकारी कोरपना यांच्या निदर्शनास हि बाब आणून देत पाठपुरावा केला. मात्र याकडे वरिष्ठ स्तरावरून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारीच्या काळात नितांत आवश्यकता असून गंभीर असलेल्या रुग्णांना तातडीने सेवा देण्यास अडचण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत सध्या उपलब्ध असलेल्या रुग्णावाहिकेची दुरुस्ती करून देण्यात यावी अन्यथा नवीन रुग्णवाहिका देण्यात यावी अशी मागणी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे करण्यात येत आहे.