अवैध देशी दारुसह ३ लाख ९१ हजाराचा मुद्देमाल जप्त, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात कारवाई
भद्रावती/प्रतिनिधी (६ जून) : भद्रावती येथे अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारावर छापा मारून पोलिसांनी अवैध देशी दारूच्या साठ्यासाह तीन लाख ९१ हजाराचा मुद्देमाल जप्त करत धडक कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे की अक्षय मन्ने,मनोज कटारे, प्रवीण कटारे व सूरज आगरे (रा. शास्त्री नगर, भद्रावती) यांनी घराच्या वॉलकुंपणा लगत विक्रीसाठी अवैध देशी दारूचा साठा करून ठेवला होता. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर ठिकाणी पोलिसांनी छापा मारला असता ३६ खरड्याचे खोके मिळाले. यात प्रत्येक खोक्यात ९० मिलीच्या १०० नग याप्रमाणे रॅकेट संत्रा देशी दारूच्या सिलबंद अशा एकूण ३६०० नग निपा आढळून आल्या. प्रत्येक निप १०० रुपये प्रमाणे तीन लाख साठ हजार रुपयांची देशी दारू मिळाली. तसेच आरोपींजवळ ४ मोबाईल मिळाले. मोबाईलची एकूण किंमत ३१ हजार रुपये असा एकूण तीन लाख ९१ हजाराचा मिळालेला मुद्देमाल पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतला. सदरच्या तीन आरोपींवर भद्रावती पोलीस स्टेशन येथे कलम ६५ (ई), ८३ म.दा.का. सहकलम १८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई चंद्रपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनीलसिंग पवार, गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार, पोलीस शिपाई केशव विटगिरे, निकेश ढेंगे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.