म्युकरमायकोसिस आजाराच्या उपाययोजना व नियंत्रणाबाबत आढावा बैठक
म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारासाठी 40 बेड तातडीने कार्यान्वित
चंद्रपूर दि.23 मे : कोरोना विषाणू हा संसर्ग आजार सुरू असतानाच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अशा रुग्णांना विहित वेळेत योग्य उपचार मिळावा यासाठी खाजगी रुग्णालयात 40 बेड तातडीने कार्यान्वीत करण्यात आले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे म्युकरमायकोसिस या आजाराच्या उपचारासाठी आवश्यक आरोग्य सोयी सुविधा त्वरीत उपलब्ध करून घेण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिलेत.
या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, अधिष्ठाता डॉ. टेकाडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.अविष्कार खंडाळे, चंद्रपूर,महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुमित भगत तसेच खाजगी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर सदर बैठकीला उपस्थित होते.
एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत म्युकरमायकोसिस या दुर्धर आजाराकरिता योजनेअंतर्गत अंगीकृत वासाडे रुग्णालय ( डॉ. अजय वासाडे) येथे 20 बेड व क्राईस्ट रुग्णालय,तुकूम येथे 20 बेड असे एकूण 40 बेड कार्यान्वित करण्यात आलेले आहे.
रुग्णांना सदर योजनेअंतर्गत मोफत आैषधोपचार तथा शस्त्रक्रिया पुरविण्यात येणार आहे. याकरिता योजनेअंतर्गत एकूण 19 पॅकेजेस उपलब्ध करून देण्यात आलेले असून शस्त्रक्रियेसाठी 11 पॅकेजेस तर औषध उपचाराकरिता आठ पॅकेजेस देण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे सदर खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य पोर्टल मध्ये म्युकरमायकोसिस करिता आवश्यक बदल तातडीने करून घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी दिल्यात.
सदर योजनेचा लाभ हा राज्यातील सर्व नागरिकांना उपलब्ध असून त्याकरिता सर्व राशन कार्ड, तहसीलदार यांचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र आणि कोणतेही एक शासन मान्य फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांच्या मदतीकरिता आरोग्य मित्र उपलब्ध असून रुग्णांनी लाभाकरिता आरोग्य मित्रांना संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी म्हणाले की, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अथवा मधुमेह नियंत्रणात नाही, अशा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराची लागण होताना दिसून येत आहे. प्राथमिक स्तरावर उपचार झाल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. त्यामुळे कंट्रोल रूमच्या माध्यमातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची फोनद्वारे आरोग्य संबंधी माहिती जाणून घ्यावी. शुगर नियंत्रणात ठेवण्याकरिता डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना आवश्यक सूचना द्याव्यात. व दोन ते तीन आठवडे रुग्णांवर लक्ष द्यावे तसेच खाजगी रुग्णालयामध्ये जे रुग्ण भरती असतील त्यांनासुद्धा याबाबत अवगत करावे. तसेच या आजाराच्या उपचाराकरिता लागणारी आधुनिक साधनसामुग्री, उपकरणे लवकरच उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी दिली.
जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे या आजाराच्या उपचारासाठी तातडीने 40 बेड कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तसेच येत्या काही दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे नव्याने बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.