युवक काँग्रेसच्या सत्कार्याला शिक्षक भारती आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचा हातभार
सुखसागर झाडे : कोरोनाच्या महामारित सर्वचजण आत्मरक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र प्रत्येक कुटुंबात कोणत्या ना कोणत्या आप्तेष्टांना कोरोनाची लागण झाल्याने नातेवाइकांची धावपळ सुरू झाली आहे. यातच येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सीमावर्ती भागातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर आदी ठिकाणांहून रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यांच्या सोबत मदतनीस म्हणून आलेल्या नातेवाईकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. प्रामुख्याने लाॅकडाऊन असल्यामुळे जेवनाची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे व इतर सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांसाठी भोजन वितरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मागील 20 दिवसांपासून सातत्याने हा उपक्रम सुरू आहे. या युवक काँग्रेसच्या सत्कार्याला सहकार्य करावे म्हणून समाज घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षक भारती आश्रमशाळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भोजन वितरण कार्यक्रमात सहभागी होऊन स्वत:च्या हातांनी कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरीत केले. समाज घडविण्याचे काम करणाऱ्या हातानी आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत, असा संदेश या शिक्षक भारती आश्रमशाळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना यामाध्यमातून दिला. यावेळी गडचिरोली जिल्हा शिक्षक भारती अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष महेश बोरेवार, प्रकल्प उपाध्यक्ष अनिल साहारे, जिल्हा सचिव नितीन चंबूलवर, प्रकल्प सचिव रविंद्र अलोने आदी मान्यवर उपस्थित होते.