कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत द्या!
तहसीलदार राजुरा यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन ; पुरोगामी पत्रकार संघाची मागणी
राजुरा, 4 ऑगस्ट (अमोल राऊत) : कोरोनाच्या महामारीची भीषणता सध्या देशभरात आहे. या कालावधीत जीवाची पर्वा न करता कोरोना योद्ध्यांची भूमिका पत्रकारांनी निभावली. या साथीत मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आधार देत 50 लाखांची मदत करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन पुरोगामी पत्रकार संघातर्फे राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार राजुरा यांच्या मार्फत देण्यात आले.
बीड जिल्ह्यातील गेवराई येथील दैनिक सामना चे तालुका प्रतिनिधी संतोष भोसले यांचे कोरोनाच्या भीतीपोटी ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. तसेच लातूर येथील पत्रकार गंगाधर सोमवंशी कोरोनामुळे मरण पावल्याची माहिती पुरोगामी पत्रकार संघाला मिळाली आहे. सदर दोन्ही पत्रकारांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दोन्ही पत्रकारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करून कर्तव्य बाजवावे, अशी विनंती पुरोगामी पत्रकार संघाचे निवेदनातून केली आहे. सदर मागणीचे निवेदन पुरोगामी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले. यावेळी राजुरा तालुका संपर्क प्रमुख अमोल राऊत, आनंदराव देठे, धनराज उमरे आदी उपस्थित होते.