‘आरोग्यावर बोलू काही’ ऑनलाइन कविसंमेलन रंगले
पं.स.पोंभूर्णाचा स्तुत्य उपक्रम : जिल्ह्यातील कवींची कवितेतून जनजागृती
पोंभुर्णा :
विकास कामासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी पोंभुर्णा पंचायत समितीचा नेहमीच पुढाकार असतो. कोरोना महामारित जिल्ह्यातील कवींच्या लेखणीतून जनजागृती व्हावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने समान संधी, समान न्याय व समान सन्मान या धोरणाचा अवलंब करित संदेशात्मक ‘आरोग्यावर बोलू काही’ विषयावर जिल्ह्यातील निवडक कवींचे ऑनलाईन कवी संमेलन पंचायत समितीतर्फे पार पडले. एकूण १७ कवींचे ऑनलाइन कवी संमेलन आरोग्य विषयक संदेशाने चांगलेच रंगले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, पंचायत समिती सभापती अल्काताई आत्राम यांच्या मार्गदर्शनात व गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून संदेशात्मक कवी संमेलन पार पडले. प्रसिद्ध कवी नरेशकुमार बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली व कवी विजय वाटेकर यांच्या परीक्षणात जिल्ह्यातील १७ कवींनी सहभाग नोंदविला.
‘करोनाशी लढतांना शहीद काही झाले
देश सेवेसाठी त्यांचे जीवन कामी आले’
कवी नरेशकुमार बोरीकर यांनी कवितेतून संकटाच्या काळात योगदान देताना शहिद झालेल्यांना आदरांजली वाहीली. कवी दूशांत निमकर यांनी ‘आरोग्याची काळजी’ या कवितेतून दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्त्व विशद केले. कवी सुधाकर कन्नाके यांनी ‘ग्रामवैभव’ कवितेतून गावागावात स्वच्छता विषयक जनजागृती करण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी कोरोना संकटाशी सामना करण्याच्या उपदेशाने पाळणा गीत सादर केले.
शौचालय बांधा | आपल्या दारात |
स्वच्छता भारत | स्वप्न पूर्ण ||
कवी अरुण घोरपडे यांनी या अभंग रचनेतून शौचालयाचे महत्त्व सांगितले. कोरपनाचे कवी जयवंत वानखेडे व्यसनाधीनतेवर कविता सादर करून व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा असा आशावाद मांडला. कवी गजानन माद्यस्वार यांनी ‘पचेल इतके खाणे खावे, ऐटीत थोडे गाणे गावे’ या काव्य ओळीतून मानवी गुणधर्म सांगितला.
कविसंमेलनात कवी बि.सी.नगराळे, चंद्रपूर,
कवयित्री मिनाताई बंडावार, चंद्रपूर,
कवयित्री शितल धर्मपुरीवार, चंद्रपूर, कवी धर्मेंद्र कन्नाके, उर्जानगर, कवी नरेंद्र कन्नाके, शेगांव बु., कवी सुरेंद्र इंगळे, उर्जानगर, कवी मिलेश साकुरकर, चंद्रपूर, कवी संतोषकुमार ऊईके, गोंडपिपरी, कवी सुनिल बावणे, बल्लारपूर, कवी गोपाल शिरपुरकर, चंद्रपूर, यांनी आरोग्यविषयक कविता सादर करून जनजागृती केली. सहभागी कवींना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन पंचायत समिती तर्फे गौरव करण्यात आला.
============
जगभरात कोरोना विषाणूचा विळखा घट्ट बसला आहे. अशा भयावह परिस्थितीत शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ही स्थिती बघता जिल्ह्यातील कवींच्या कवितेतून व्यापक जनजागृती व्हावी, आरोग्यविषयक जनमाणसातली भिती नाहीशी होऊन शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करुन समज-गैरसमज दूर व्हावेत, जनजागृती व्हावी या हेतूने ऑनलाईन कविसंमेलन घेण्यात आले. यात जिल्ह्यातील कवींनी प्रतिसाद दिल्याचा आनंद आहे.
-धनंजय साळवे
गटविकास अधिकारी पोंभुर्णा
=============