दत्तक गावांमध्ये सीएसआर निधी अंतर्गत तात्काळ विलीगीकरण कक्ष उभारा
आशिष देरकर यांची अल्ट्राटेक कंपनीला मागणी
आवाळपुर, नितेश शेंडे : अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या दत्तक गावांमध्ये येत असलेल्या नांदा, बिबी, आवारपूर व हिरापूर या गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला असून सीएसआर निधी अंतर्गत या गावांसाठी कोविड विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी एकूण 150 बेड, वैद्यकीय सेवा व आहार व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी राजुरा विधानसभा युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष तथा बिबी ग्रामपंचायतचे उपसरपंच आशिष देरकर यांनी अल्ट्राटेक कंपनी प्रशासनाकडे केली आहे.
नांदा, बिबी, आवारपूर, हिरापूर ही गावे आपल्या सीएसआर अंतर्गत येत असून या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला आहे. भविष्यात हा संसर्ग वाढू नये व कोणताही कोवीड रुग्ण घरी राहून त्याच्या संपूर्ण परिवाराला संसर्ग होऊ नये, यासाठी विविध ग्रामपंचायतीच्या वतीने विलगीकरण कक्ष उभारण्याचे काम सुरू आहे. करिता आपण सीएसआर निधी अंतर्गत नांदा-५०, बिबी-३०, आवारपूर-४०, हिरापूर-३० याप्रमाणे सीएसआर अंतर्गत एकूण 150 बेड, वैद्यकीय सेवा व आहार व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आशिष देरकर यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहे.
मदत नाही तर जबाबदारी म्हणून काम करावे -आशिष देरकर, उपसरपंच ग्रा. पं. बिबी
रुग्ण घरच्या घरी राहत असल्यामुळे संसर्ग वाढत आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण परिवाराला संसर्ग होत आहे. नांदा, बिबी, आवारपूर, हिरापूर हि गावे अल्ट्राटेक परिसरातील असून दरवर्षी या गावांमध्ये कंपनी पायाभूत व वैद्यकीय सेवांसाठी लाखो रुपये खर्च करीत असतात. मात्र यावेळी कोरोनाचा संसर्ग परिसरात मोठ्याप्रमाणात वाढला असून ३० पेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले आहे. आता संसर्गजन्य व्यक्तीला विलीगीकरण कक्षात ठेवल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कंपनीने पुढाकार घेऊन काम पार पाडावे.