कोरोना काळातही अंतरगाव (बु) येथे दारूविक्री जोरात
अवैध दारू घेण्यासाठी बाहेरगावतील लोकांचा गावात शिरकाव
कोरोनाचा प्रसाराच्या भीतीनं ग्रामपंचायत अंतरगाव (बु) तथा ग्रामस्थांची कोरपना पोलिसात लेखी तक्रार
आवाळपुर, नितेश शेंडे : कोरपना तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख पाहता जिल्ह्यात कोरपना तालुका आघाडीवर असून अशातच कोरपना तालुक्यात वाढते अवैध धंदे हा परिसरातील लोकांच्या डोकेदुखीचे कारण बनत असून असाच एक प्रसंग आवाळपुर येथून जवळच असलेल्या अंतरगाव (बु) येथे घडला आहे.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, मागील काही दिवसांपासून अंतरगावात अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. गावातील काही नागरिकच गावात खुलेआम दारूविक्री करताना दिसून येत आहे. यामुळे गावात परिसरात गावातील लोकांची मोठी रहदारी सुरू झाल्याचे निदर्शनास येत आहे, यातच परिसरातील हिरापूर, सांगोडा हे सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. यातच या गावातील काही मद्यशौकीन अंतरगाव येथे अवैध दारू घेण्यासाठी ये जा करत आहे. यामुळे गावात कोरोनाचा प्रसार होण्याची शंका असल्याने गावातील काही प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील तथा ग्रामपंचायत अंतरगाव (बु) येथील ग्रामपंचायत सदस्यांनी कोरपना पोलीस स्टेशन येथे धाव घेतली असून लेखी स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे.
कोरपना तालुक्यातील बीबी, आवाळपुर, हिरापूर, नांदाफाटा याठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात खुलेआम अवैध दारूविक्री केली जात असताना नेहमी बघ्याची भूमिका घेणारे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अंतरगाव ग्रामपंचायती प्रमाणे लेखी तक्रार देतील का ? ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासन याकडे किती गांभीर्याने बघतील हे औत्सुक्याचे ठरणार आहे.