राष्ट्रीय महामार्गावरील रहदारीच्या वरुर रोड येथे अवैध विषारी दारूची राजरोसपणे घरून विक्री, प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी
राजुरा, अमोल राऊत : तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या ८ किमीच्या अंतरावर असिफाबाद या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वरूर रोड येथे मागील कित्येक वर्षांपासून अट्टल दारू तस्कराकडून जिल्हा परिषद शाळा इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध विषारी दारूची राजरोसपणे घरून विक्री केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीचा हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र पोलीस प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने डोळ्यावर पट्टी बांधल्याचा गाफिलपणा उघड झाला आहे.वरूर रोड येथील या अट्टल दारू तस्कराकडून परिसरातील खेडे गावात अवैध विषारी दारूचा पुरवठा केला जात असल्याची माहिती असून घरूनच विक्री केली जात असल्याची माहिती प्राप्त आहे. अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने या मात्तबर अट्टल दारू तस्कराला मोकळे रान मिळाले असून प्रशासनाला वरचढ ठरत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना महामारीच्या काळात कडक निर्बंध असतांना त्याचे पालन होत नसतांना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. एक्साईज, बीज जमादार, डीबी पथक यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? हा एकच प्रश्न निर्माण झाला आहे. या विषारी दारूच्या आहारी गेलेल्या आंबटशौकिनाचे कुटुंब उघड्यावर पडत असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. शिवाय यात किशोरवयीन मुलांचा अलीकडे भरणा वाढत असल्याने सामाजिक आरोग्यावर याचा परिणाम होत असून गुंडप्रवृत्तीला कुपोषक वातावरण निर्माण होत आहे. यावर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केल्या जात आहे. पोलीस प्रशासनातील काही भेदी कर्मचाऱ्यांच्या वरदहस्तानेच येथील अट्टल दारू तस्कर सरसावला असल्याची चर्चा स्थानिक जनतेत चांगलीच जोर धरू लागल्याचे दिसून येते.