लसिकरणासाठी सुक्ष्म नियोजनासह तयार राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक संपन्न
कोरोना उपाययोजना व लसीकरणाबाबत घेतला आढावा
चंद्रपूर दि. 29 एप्रिल : राज्य शासनातर्फे 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाबाबत लवकरच विस्तृत सूचना प्राप्त होतील, मात्र तोपर्यंत लसीकरणाबाबत जिल्हा स्तरावर सूक्ष्म नियोजन करून तयारीत राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत दिल्यात.
जिल्ह्यात वाढत असलेली रुग्ण संख्या व त्या संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच नागरिकांच्या लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक पार पडली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड,उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की जिल्ह्यात कोरोना सदृश्य परिस्थितीत व्हेंटिलेटर, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपलब्ध औषध साठा तसेच कोविडच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी जसे की जम्बो सिलेंडर, ऑक्सीजन प्लांट, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरयासारख्या गोष्टींची कमतरता असल्यास त्वरित उपलब्ध करून घ्याव्यात.
कोविड काळात रुग्णांना विहित वेळेत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी व्हेंटिलेटर, औषध साठा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सीजन प्लांट, जंबो सिलेंडर इत्यादी आवश्यक साधन सामुग्रीच्या उपलब्ध साठ्याची माहिती तयार करून ठेवावी, असेही ते म्हणाले.
केंद्र शासनाने 18 वर्षावरील सर्व नागरिकांना १ मे पासून लस देण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी याबाबत राज्य शासनातर्फे विस्तृत मार्गदर्शन प्राप्त झाल्यावरच प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सध्या लसीकरणासाठी सहा खाजगी लसीकरण केंद्र सुरू असून जिल्ह्यात लसीकरणासाठी 194 टीम कार्यरत आहे. तसेच ग्रामीण भागात आणखी 40 टीम वाढविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी लसीकरण अधिकारी डाॅ.संदीप गेडाम यांनी दिली.
यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तालुक्याचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी संवाद साधला. जिल्ह्यात आढळणारे दैनंदिन बाधित रुग्ण, दैनंदिन मृत्यू, होम आयसोलेशन मधील रुग्ण, डिस्चार्ज झालेले रुग्ण त्यांची उपलब्ध माहिती पोर्टलवर दैनंदिन अपडेट करावी असे निर्देश दिलेत.
आरटीपीसीआर तपासणी नमुन्यांच्या वाहतुकीसाठी नऊ वाहने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तालुकास्तरावर वाहनांची आवश्यकता असल्यास उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांनी मागणी करून घ्यावी व तसे प्रस्ताव सादर करावे असेही ते म्हणाले.
तालुकास्तरावर ब्रह्मपुरी, मूल, वरोरा या ठिकाणी नव्याने कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये मनुष्यबळ वाढविण्याचे नियोजन करणे. तसेच कोविड केअर सेंटर मधील उपलब्ध बेड, शिल्लक बेड, उपलब्ध मनुष्यबळ, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सीजन प्लांट याचा चार्ट तयार करून ठेवावा तसेच तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी व तहसिलदार यांनी स्वतः लक्ष घालून कोविड केअर सेंटर तयार करून घ्यावे.
तालुकास्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीला आयसोलेशन सेंटर तयार करण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे, त्या निधीचा अनुषंगिक वापर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. कोरोना संकटाच्या काळात मनुष्यबळाची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्यामुळे तालुकास्तरावर एएनएम पुढे येऊन सेवा द्यावी. त्यांना त्यांच्या तालुक्याच्या कोविड केअर सेंटर मध्येच सेवा उपलब्ध करून देण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी म्हटले.
रुग्णांच्या तपासणीसाठी अँटीजेन तपासणी किटची कमतरता असल्यास त्या त्वरित उपलब्ध करून घ्याव्यात. पुढील काळात कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्यात आली आहे त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी इतर विभागाकडून कर्मचारी घेऊन नवीन टीम तयार करून घ्यावी. टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा, रेमंडेसिविर इंजेक्शन,आवश्यक औषध साठा यावर लक्ष केंद्रित करणे अशा सूचना सदर बैठकीत उपस्थितांना देण्यात आल्या.
यावर सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या. बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.