गोर गरीब रुग्णांसाठी शासकीय सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करा – आ. किशोर जोरगेवार
वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना मागणी
कोरोनाच्या महासंकटात सिटी स्कॅन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. याचा फायदा घेत काही खाजगी रुग्णायांमध्ये सिटी स्कॅनसाठी कोरोना रुग्णांची आर्थिक लूट केल्या जात आहे. ही बाब लक्षात घेता गोर गरीब रुग्णांसाठी शासकीय सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना केली आहे.
काल वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते यावेळी आ. जोरगेवार यांनी त्यांची भेट घेऊन सदर मागणी केली आहे.
चंद्रपूरात आज घडीला दररोज हजारांच्यावर कोरोना रुग्ण आढळून येत आहे. यातील बहुतांश रुग्णांना सिटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिल्या जात आहे.मात्र सिटी स्कॅन सेंटरवर मोठी रक्कम घेतल्या जात असल्याने गोर गरिबांना सिटी स्कॅन करणे परवडण्यासारखे नाही. अश्यातही उधार वारी करत अनेक रुग्ण सदर तपासणी करून घेत आहे. तसेच अनेक खाजगी सिटी स्कॅन सेंटरवर सोयी सुविधांचाही अभाव आहे. त्यामुळे येथून कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेता तसेच गोर गरीब रुग्णांना योग्य उपचार घेता यावा या करिता शासकीय सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना करण्यात आली आहे. ना. अमित देशमुख यांनीही या दिशेने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.