साहेब सुविधा द्या! आमदार किशोर जोरगेवार यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना मागणी
चंद्रपुरात कोरोना अनियंत्रित झाला आहे. याचा परीणाम आरोग्य व्यवस्थेवर पडला आहे. बेड अभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तर काही रूग्णांवर उपचारासाठी राज्याबाहेर जाण्याची बिकट परिस्थिती आली. त्यामुळे साहेब येथे सुविधा द्या असे म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना अनेक मागण्या केल्या आहेत.
आज राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे चंद्रपूर दौऱ्यावर आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेत भारताचे संविधान देत त्यांचे स्वागत केले. तसेच यावेळी कोरोना रुग्णांवर योग्य उपचार व्हावा यासाठी विविध मागण्याही त्यांनी केल्या आहे. या प्रसंगी खासदार बाळू धानोरकर, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, भद्रावती – वरोरो विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 2020 पर्यंत सुरू होणे अपेक्षित होते. मात्र या कामात दिरंगाई होत आहे. त्याकडे लक्ष देत हे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे, रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, यांच्या रिक्त जागा भरण्यात यावा, आंदोलनकर्त्या कोरोना योद्धांचे वेतन अदा करून त्यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, रेडिओलॉजी विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीत तात्काळ सुरू करण्यात यावा यासह इतर मागण्या यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. अमित देशमुख यांना केल्या आहे.