नळाद्वारे येणाऱ्या पिण्याच्या पाण्यात जंतु… विरुर स्टेशन ग्रामपंचायतीने येथील नागरिकांच्या जीवनाशी मांडला खेळ
राजुरा, अमोल राऊत (२३ एप्रिल) : विरुर स्टेशन येथील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या जीवनाशी खेळ मांडल्याचे प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. येथील पाणी पुरवठा योजनेत नळाद्वारे देण्यात येणाऱ्या पाण्यात चक्क जंतू आढळून आले आहेत. यामुळे ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याबाबत किती सजग उपाययोजना करते याची जणू पोचपावतीच मिळाली आहे.
अस्वच्छ पाण्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य खराब होत असून विविध रोगांना आमंत्रण देण्याचा हा किळसवाणा प्रकार आहे. ‘पाणी म्हणजे जीवन’ पाण्याच्या शुद्धीकरणासाठी, नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने शासन दरबारी विविध योजना, उपाययोजना व जनजागृती केली जाते. मात्र यालाच तळा देण्याचे काम विरुर स्टेशन ग्रामपंचायत प्रशासनातर्फे सुरु आहे. पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सध्या कोरोना महामारीने बरेच मोठे थैमान माजवले आहे. जनतेच्या मनात अगोदरच भीती आहे. अशातच कोरोनाचा वाढत्या संसर्ग काळात दुषित पाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रत्यक्ष साफसफाई करण्याकडे कानाडोळा केल्याने जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचा निपटारा करून मार्गी कोण लावणार? हा मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याच्या टाकीची नियमित साफसफाई करण्यात यावी, असा हेळसांड करत आपल्या कर्तव्याचा विसर पडलेल्या ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर कठोर कारवाई करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा. अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.