हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयातील कोविड बेडची क्षमता वाढवा!
रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांची मागणी
हिंगणघाट, अनंता वायसे : हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ५० बेड्सची व्यवस्था असून वाढती रुग्णसंख्या पहाता येथील रुग्णालयात ही मर्यादा २०० बेड्स पर्यंत करण्यात यावी अशी मागणी प्रहारचे रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे एका निवेदनातून केली आहे.
यासंदर्भात गजू कुबडे यांनी निवेदनातुन दिलेल्या माहितीनुसार, हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात दिवसेंदिवस कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील रुग्णालयात फक्त 50 बेड्सची व्यवस्था असल्याने अन्य रुग्णांना उपचारासाठी सावंगी, सेवाग्राम, नागपूर, चंद्रपूर, अमरावती येथे जावे लागत आहे आणि बरेचदा त्याठिकाणीही व्यवस्था उपलब्ध नसल्याने रुग्णाला निराश होऊन वापस यावे लागत आहे.परिणामी अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात आक्सिजनची व्यवस्था आहे. बेड्सची व्यवस्था वाढवून 200 बेडचे कोविड रुग्णालयाला मान्यता देऊन जर सुरू केले तर अनेक रुग्णांची सोय होईल व बाहेरगावी जाण्याचे त्यांचे वेळ, श्रम व पैसा वाचल्या जाईल व होणारा मनस्ताप टाळल्या जाईल. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिकारात येथील उपजिल्हा रुग्णालयात त्वरित बेडची व्यवस्था करावी व रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी वजा विनंती रुग्णमित्र गजू भाऊ कुबडे यांनी केली आहे.