चंद्रपूर जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत जमावबंदी

0
454

जिल्ह्यात कलम 144 लागू असणार


चंद्रपूर, दि. 31 जुलै: जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज आदेश काढलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू असणार आहे. आंतरराज्य, आंतरजिल्हा, प्रवास बंद राहतील. शाळा, महाविद्यालय 31 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहेत. दुकानांची वेळ 9 ते 6 असून हॉटेल्समधून पार्सल सेवा उपलब्ध असणार आहे. लग्न समारंभाला 50 तर अंत्यविधीला 20 लोकांची परवानगी कायम आहे. नागरिकांनी केवळ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवास:

परराज्यात, राज्याअंतर्गत (चंद्रपूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात) प्रवासाकरिता https://covid19.mhpolice.in यावर ऑनलाईन अर्ज करावा. परवानगीशिवाय कोणत्याही नागरिकांनी जिल्ह्याच्या बाहेर, परराज्यातून,परजिल्ह्यातून जिल्ह्यामध्ये प्रवेश करता येणार नाही. प्रवास केल्यानंतर 14 दिवस संस्थात्मक अलगीकरण किंवा गृह अलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. गृह अलगीकरण, संस्थात्मक अलगीकरण न पाळल्यास किंवा व्यक्ती इतरत्र फिरतांना आढळल्यास 2 हजार रुपये दंड व सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्यास 200 इतका दंड आकारण्यात येईल तसेच संबंधित व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188, 269, 270, 271 नुसार कारवाई करण्यात येईल.

केंद्र शासन, राज्य शासन यांच्याकडून निर्गमित आदेशाच्या संबंधाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निर्गमित केलेल्या आदेशातील निर्देशाचे, कायद्याचे भंग करणाऱ्या संबंधित व्यक्ती, आस्थापना, नागरिक यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक 3 जून 2020 रोजीचे आदेशान्वये संबंधित पोलिस स्टेशनच्या हद्दीतील प्रभारी पोलिस अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहे.

अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी, अधिकारी व संबंधित व्यक्ती यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तींच्या हालचालीस रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत प्रतिबंध राहील.

सार्वजनिक स्थळी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होऊ नये. परंतु तिथे पाचपेक्षा कमी व्यक्ती एकत्र येत असेल त्यावेळी त्यांचे कमीत कमी 6 फूट सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील.सार्वजनिक ठिकाणी, स्थळी पान, तंबाखू, धूम्रपान करणे इत्यादीस प्रतिबंध राहील.

धार्मिक स्वरूपाचे समुपदेशन, धर्मपरिषद, धार्मिक गर्दीचे आयोजन करू नये. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात जनमानसात अफवा अपप्रचार व भीती व्हाट्सअप फेसबूक, ट्विटर, वृत्तपत्र, सोशल मीडिया व होर्डिंग इत्यादी वर प्रसारित करू नये. तसेच अधिकृत माध्यमाद्वारे माहिती न घेता दिशाभूल करणारी माहिती प्रसारमाध्यमांवर प्रसारित करू नये.

खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्ये, कार्यशाळा , प्रशिक्षण वर्ग, देशांतर्गत व परदेशी सहल यांचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील. शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, सुपरमार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण, तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा , संग्रहालये, गुटखा तंबाखू, पान विक्री इत्यादी बंद राहील. सामाजिक अंतर ठेवून दैनंदिन बाजार भरवता येईल. परंतु आठवडी बाजार भरविता येणार नाही.

जीवनावश्यक असलेल्या पुढील बाबी कार्यरत राहतील:

अत्यावश्यक किराणा सामान, दुग्ध, दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, पार्सल स्वरूपात काउंटर तसेच इतर मार्गांनी विक्री, वितरण व वाहतूक करण्यास परवानगी राहील.

जीवनावश्यक खाद्यपदार्थ किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतूक, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस मासे बेकरी, पशुखाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील. परंतु, दुकान आस्थापना यामध्ये एकाच वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक उपस्थित राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे दुकान, आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.

खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची वाहतुक व साठवण. अत्यावश्यक वस्तूंची पुरवठासाखळी आणि वाहतूक. पार्सल स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देण्याचे अटीवर उपहारगृहे, खाद्यगृहे घरगुती खानावळ स्वीट मार्केट, फरसाण सेंटर व चहा नाष्टा सेंटर सुरू राहतील तथापि प्रत्यक्ष दुकानात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्थेस मनाई असेल.

पावसाळी ऋतू संबंधित साहित्य जसे छत्री, रेनकोट, प्लॅस्टिक शीट, कव्हर यांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे सदर साहित्याची विक्री व वितरणाबाबत वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील.

शेतीविषयक उत्पादन/ सुविधा /आस्थापना संबंधाने पुढील बाकी कार्यरत राहतील:

सर्व प्रकारचे शीतगृहे, वखार ,गोदामा संबंधित सेवा, घाऊक वितरणासाठी आणि सदर बाबींशी संबंधित पुरवठा साखळी, कृषी उत्पादन व किमान आधारभूत किंमत यांच्याशी संबंधित कार्य करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी, बाजार विशेषतः कापूस, तुर व धान खरेदी, विक्री आस्थापना, दुकाने सुरू राहतील.

शेतकरी व शेतमजूर यांचेकडून करण्यात येणारी शेतीविषयक कामे मासेमारी व मत्स्य व्यवसाय संबंधित सर्व कामे व शेती विषयक अवजारे, यंत्र विक्री व दुरुस्ती संबंधित मान्यताप्राप्त दुकाने, आस्थापना (किमान मनुष्यबळासह), शेती संबंधित यंत्रे, अवजारे चालविण्यासाठी आवश्यक असणारा मजूरवर्ग, केंद्र, शेतमाल आणि अन्य वस्तूंची आयात निर्यात आणि वाहतूक, राज्यांतर्गत व आंतरराज्यीय कृषी, फलोत्पादन संबंधित अवजारे, यंत्रे जसे पेरणी, कापणी यांची वाहतूक.खते कीटकनाशके व बियाणे यांच्याशी निगडित उत्पादन व पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग, आस्थापना, दुकाने संपूर्ण जिल्ह्याकरिता सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहतील.

लग्न समारंभाकरिता पुढीलप्रमाणे परवानगी राहतील:

लग्न समारंभ (50 लोकांच्या उपस्थितीत) सामाजिक अंतर राखून करण्यास परवानगी असेल. परंतु, सदर परवानगीही उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांचेकडून प्राप्त करणे बंधनकारक राहील. विवाह करिता 50 लोकांच्या कमाल मर्यादित उपस्थितीत ज्यामध्ये प्रत्येकी पाच व्यक्तींचे बँड पथक सुगम संगीत कलावंत यांची उपस्थिती ठेवून खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात पार पाळण्यास परवानगी असणार आहे. तसेच, अंत्यविधीकरिता सामाजिक अंतर राखून 20 लोकांचे उपस्थितीस परवानगी राहील.

प्रवास व प्रवासी वाहतूकी संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:

जिल्हांतर्गत प्रवासाकरिता बस सेवा व 50 टक्के प्रवासी क्षमतेचा सामाजिक अंतर राखून निर्जंतुकीकरण उपाय राबवून सुरू राहतील.

जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यास (दुचाकी,चारचाकी वाहनाने) नागरिकांस कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही. परंतु, चारचाकी वाहनाच्या बाबतीत वाहन चालकासह केवळ तीन प्रवासी वैद्य राहील आणि वाहनांमध्ये सॅनीटायजर ठेवून प्रवास करणाऱ्या व्यक्तीस मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच दुचाकी करिता दुचाकीचालकासह एक व्यक्तीस परवानगी असणार आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्राकरिता प्रवासी वाहतूक करिता रिक्षा, ऑटोरिक्षा चालक व दोन प्रवाशांसह रिक्षा ऑटोरिक्षाची वाहतूक सुरू राहील.

परंतु रिक्षा, ऑटोरिक्षा मध्ये सॅनीटायजर ठेवणे व मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल सदर वाहतूक ही केवळ वरील प्रमाणे त्या -त्या क्षेत्र पुरतीच मर्यादित राहील. व निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करता येणार नाही. दुचाकी, चारचाकी, रिक्षा, ऑटोरिक्षा याद्वारे सायंकाळी 9 ते सकाळी 5 या कालावधीत प्रवास करता येणार नाही.

शासकीय व खाजगी कार्यालय संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळ कार्यालय 100 टक्के कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती सुरू राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेजमधील कार्यालय, कर्मचारी यांची अध्यापना व्यतिरिक्त कामाकरिता जसे ई-लर्निंग कन्टेन्ट, उत्तरपत्रिकांची तपासणी,निकालपत्र संबंधित कार्यवाही करण्याकरिता उपस्थितीस परवानगी असणार आहे.

उद्योग संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:

सर्व प्रकारचे शहरी व ग्रामीण भागातील औद्योगिक आस्थापना,वसाहती, युनिट सुरू राहतील. परंतु कोविड-19 संबंधाने राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

बांधकाम संबंधी पुढील बाबी कार्यरत राहतील:

शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारची बांधकामे सुरू राहतील.परंतु बांधकाम स्थळी कामगार उपस्थित राहील व कोणत्याही कामगारांस बाहेरून आणण्यास परवानगी नसेल परंतु कोविड-19 संबंधाने राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

लोकांच्या व्यक्तिगत कवायत बाबत पुढील बाबी कार्यरत राहतील:

मैदानी बिगर संघीय खेळ जसे गोल्फ कोर्स, आउटडोर फायरिंग रेंज, जिम्नॅस्टिक्स, टेनिस, बॅडमिंटन आणि मल्लखांब यासारख्या क्रीडांना शारीरिक अंतर व स्वच्छता उपाय राबवून दिनांक 5 ऑगस्टपासून सुरू ठेवण्याची परवानगी राहिल.

सलून, स्पा, बार्बर शॉप, ब्युटी पार्लर, केस कर्तनालय सुरु राहतील:

सलून,स्पा, केस कर्तनालय या आस्थापना सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहतील. यामध्ये केवळ हेअरकट, डाईंग हेअर, थ्रेडींग करण्यास परवानगी असेल विशेषत: त्वचेसंबंधी कोणत्याही बाबीस परवानगी असणार नाही. यासंबंधी पत्रक दुकानाचे दर्शनी भागावर प्रसिद्ध करावेत.

मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स मधील पुढील बाबी दिनांक 5 ऑगस्टपासून कार्यरत राहील:

मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहतील. मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृहे, कोर्ट, रेस्टॉरंट सुरू ठेवता येणार नाही तथापि फूड कोर्ट, रेस्टॉरंट यामधील किचन खाद्यपदार्थांच्या होम डिलिव्हरी करिता सुरू ठेवता येतील.

आंतरराज्यीय सीमा प्रवासी वाहतुकीकरिता बंद असेल परंतु सर्व प्रकारची मालवाहतूक, अत्यावश्यक मालवाहतूक नसली तरी परवानगी असणार आहे. राज्यांतर्गत, आंतरराज्यीय मालवाहतूक समयी ट्रक चालक व अतिरिक्त एक व्यक्ती वैद्य कागदपत्रासह मालवाहतूक अत्यावश्यक असली अथवा नसली तरी सुरू राहील. त्याकरिता वेगळा परवाना आवश्यक नाही. मालवाहतूक करून खाली ट्रकांची वाहतूक सुद्धा यामध्ये समाविष्ट राहील.

शैक्षणिक व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या बाबतीत ऑनलाईन पद्धतीने डिस्टन्स लर्निंग चालू ठेवता येईल.

जीवनावश्यक वस्तू विक्री व वितरण इत्यादी आस्थापना, दुकाने याव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारचे बास्थापना, दुकाने सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहतील.परंतु आस्थापना, दुकाने समोर आणि फुटपाथवर कोणतेही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.

जीवनावश्यक वस्तू विक्री व वितरण इत्यादी आस्थापना, दुकाने याव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची दुकाने आठवड्यातून किमान एक दिवस संपूर्णता बंद राहतील. सदर दिवशी स्थानिक परिस्थितीचा विचार करून स्थानिक प्रशासनाकडून घोषित करण्यात येईल.

परवानगी देण्यात आलेले कामाचे ठिकाण, सार्वजनिक स्थळी दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने येथे कार्यरत कामगार, कर्मचारी तसेच सुविधेचा लाभ घेणारे जिल्ह्यातील सर्व नागरिक यांनी कायम मास्कचा वापर करणे तसेच आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील.

सदरील आदेशांचे पालन न करणारे, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, 269, 270,271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सदरचा आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत करीता लागू राहील तसेच प्रतिबंधित क्षेत्राकरिता (कंटेनमेंट झोन) लागू राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here