अमृतच्या शुभारंभ कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा दाखल करा
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांची मागणी
चंद्रपूर : कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. कार्यक्रमात मोठी गर्दी करणाऱ्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही जाहीर केले आहे. माञ, शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये महापालिकेच्या अमृत योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमात प्रशाशनाच्या नियमनाची ऐशीतैशी करीत मोठी गर्दी जमविण्यात आली होती. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यात चंद्रपूर शहर महानगर पालिका क्षेत्र आघाडीवर आहे. त्यामुळे जिल्हा व मनपा प्रशाशनाने कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करावे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या संकटकाळात समाजातील सर्वच घटकांनी सर्व नियमांचे पालन करून प्रशाशनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. माञ, महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप नगरसेवकांना कोरोना काळाचे भान राहिलेले दिसत नाही, हे अमृत योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या आयोजनावरून दिसून येते.
महापालिकेतील भाजप सत्ताधारी नगरसेवकांकडून मागील काही दिवसात आयोजित कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात आहेत. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे प्रशाशनाने गंभीर दाखल घेऊन आयोजकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रामू तिवारी यांनी केली आहे.