विकास कामातून सिंदेवाहीचा लवकरच कायापालट – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
चंद्रपूर दि. ३ एप्रिल : सिंदेवाही विभागात मोठ्या प्रमाणात विकास कामांना मंजुर देण्यात आली असून ही कामे पूर्ण झाल्यावर लवकरच या भागाचा कायापालट होईल असे आश्वासन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले.
नगरपंचायत सिंदेवाहीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या बाजार ओट्याचे बांधकाम, स्मशानभूमीचे बांधकाम व खुले भुखंड सौंदर्यीकरण कामांचे भूमिपूजन आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सिंदेवाहीच्या नगराध्यक्षा आशा गंडाटे, उपाध्यक्ष स्वप्नील कावळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, मुख्याधिकारी सुप्रिया राठोड, सरपंच रूपाली रत्नावार, नगरसेवक भुपेश लाडे इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की आता ज्या कामांना मंजुरी दिली आहे ती कामे पुढील दोन-तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येतील. उन्हाळ्यात नागरिकांना थंड व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाण्याचे 19 एटीएम बसविण्यात येणार असून यासाठी 1 कोटी 65 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. रस्ते बांधकामासाठी 33 कोटी, ई-लायब्ररी, तहसील इमारतीचे सौंदर्यीकरण, पोलिस स्टेशन इमारतीचे बांधकाम, पोलिसांचे निवासस्थान, पंचायत समिती इमारत, ग्रामीण रुग्णालयाचे 100 बेडमध्ये अद्यावतीकरण, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेला कुम्पण, पर्यटन सफारी, अग्निशमनची गाडी, वन उपजावर आधारित प्रकल्प इ. कामे सिंदेवाही मध्ये मंजूर करण्यात आली आहेत. तसेच 2023 पर्यंत गोसेखुर्द कालव्याचे काम पूर्ण होऊन सिंदेवाहीतील 65 टक्के जमीन सिंचन सिंचनाखाली येईल व मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होऊन शेतीसाठी वरदान ठरेल. सिंदेवाही शहर झपाट्याने विकासाच्या दिशेने पुढे जाईल असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्षा आशा गंडाटे यांनी केले. नगरपरिषदेच्या कामासाठी चार कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला सिंदेवाही नगरपंचायतीचे नगरसेवक तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.