वाघ बघायचं आहे….
पाेंभूर्णा गेटला भेट द्या
पाेंभूर्ण्यात पर्यटन व मचान सफारी
सुरू
पाेंभूर्णा :-
चंद्रपूर वनवृत्त व मध्य चांदा वनविभागातील वनपरिक्षेत्र पाेंभूर्णा अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती केमारा च्या माध्यमातून केमारा गावालगतच्या वनक्षेत्रात ग्रामिणांच्या सक्रिय सहभागातून वन वन्यजीव व्यवस्थापन करणे, मानव व वन्यजीव यांच्यात सहजीवन प्रस्थापित करून वनाचे शाश्वत जतन करून ग्रामिणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केमारा समितीच्या ठरावाद्वारे केमारा लगतचे जुने मार्ग दुरुस्ती करून वीस किलोमिटरचे कच्चे रस्ते पर्यटनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
वाघ व वन्यप्राणी, वनसंपदेची सुरक्षा व संवर्धनाकडे मागील काही वर्षांपासून वन विभागाने विशेष लक्ष दिल्याने प्रादेशिक वनक्षेत्रात वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे याक्षेत्रातही पर्यटन सफारी होऊ शकते, हे लक्षात आल्याने वन विभागाने पाेंभूर्णा वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या केमारा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांना सोबतीला घेतले. पर्यटन सफारीचे महत्त्व समजवल्यानंतर समितीने काही दिवसांपूर्वीच ठराव पारित केला. नियोजनाप्रमाणे २५ मार्च ला पाेंभूर्णा पर्यटन व मचान सफारीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उद्घाटक म्हणून पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण तसेच माजी नगराध्यक्ष श्वेता वनकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक कवडूजी कुंदावर, मध्य चांदाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, सहाय्यक वनसंरक्षक प्रितमसिंह कोडापे, वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, वनक्षेत्र अधिकारी यादव व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पर्यटक उपस्थित होते.
——————————-
स्थानिकांना मिळणार रोजगार
पाेंभूर्णा वन क्षेत्रात वाघ व विविध वन्य प्राण्यांची संख्या लक्षवेधी आहे. पट्टेदार वाघांच्या अधिवासासाठी पाेंभूर्णा वनक्षेत्र पाेषक आहे. वाघ, बिबटे, रानगवे, चाैसिंगा, सायाळ, निलगाय आदी प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत.
विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठीही हे क्षेत्र पाेषक आहे. १५० प्रकारचे पक्षी व विविधरंगी फुलपाखरे यांचाही यात समावेश आहे. दिवसातून सकाळी ६. ते १० वाजता आणि दुपारी २ ते ४ वाजता प्रत्येकी सहा वाहने सोडण्यात येणार आहेत. प्रत्येक चारचाकी वाहनासाठी पाचशे रूपये शुल्क आकारण्यात आले असून तीनशे पन्नास रूपये गाईडचे शुल्क राहणार आहे.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर खासगी वाहनांना प्रवेश देणे सुरू झाले आहे.
भविष्यात नोंदणीकृत वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे.
स्थानिक युवकांना गाइड म्हणून प्रशिक्षित केले जात आहे. पाेंभूर्णा येथील सफारीसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या संकेतस्थळावरूनही पर्यटकांना बुकिंगची सुविधा भविष्यात उपलब्ध होणार आहे . या पर्यटन सफारीमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्य वनसरंक्षक एन. आर. प्रवीण व वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे यांनी दिली.