जिवतीत नामवाड कुटुंबीयांना जबर मारहाण
पोलिसांनी कडक कारवाई करावी ; कुटुंबीयांची मागणी
२२ मार्च २०२१ (सोमवार) ला एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त गडचांदुर येथील आशिष नरसिंग नामवाड (४५ वर्षे), त्यांची पत्नी सरिता आशिष नामवाड (४२ वर्षे) व मुलगा हिमांशू आशिष नामवाड (२१ वर्षे) हे दमपुर मोहदा (ता. जिवती) येथे जात होते. जिवती येथील घोगरे स्टोअर्स येथून लिफाफा घेत असताना हिमांशू नामवाड यांना राजकीय पार्श्वभूमी असलेल्या अंकुश गोतावळे यांनी तू मला ओळखतो का ? असा प्रश्न विचारला. त्यावर हिमांशू याने “मॉस्क लाऊन असल्याने ओळखता येत नाही ” असे उत्तर दिले. त्यांनतर अंकुश गोतावळे व त्यांचे ८-९ सहकारी लगतच्या मरेवाड चौकात जमले. एकंदरीत हे सगळे मारण्याच्या बेतात दिसतात म्हणून हिमांशु यांनी आपल्या वडिलांना फोन केला तेव्हा त्याची आई – वडील दोघेही तिथे आले. गुंड प्रवृत्तीच्या अंकुश गोतावळे व त्याच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण नामवाड कुटुंबीयांना भर चौकात मारहाण करण्यास सूरवात केली. हाता बुक्क्यांसह बॅटचा देखील वापर केला अशी माहिती आज पत्रकार परिषदेत हिमांशु आशिष नामवाड यांनी दिली. तर, माझ्यासहित मुलगा व पत्नी यांचेवर हात उचलणे, जबर दुखापत होतपर्यंत मारहाण करणे ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे आशिष नरसिंग नामवाड म्हणाले.
सदर घटनेनंतर ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे उपचार केल्यानंतर नामवाड कुटुंबीय चंद्रपूर येथील शासकिय रुग्णालयात आले आहे. आई व वडिल दोघांना अधिक मार लागलेला असून याबाबत जिवती पोलीस स्टेशनला मी तक्रार दिली असून माझ्या आईला मारहाण होऊन देखील तिचे बयाण पोलिसांनी घेतले नाही असे हिमांशु नामवाड म्हणाले. पुढे ते म्हणाले की, भारतीय दंड विधान संहितेतील कलम ३२३, १४३,१४७,१४९ नुसार गोतावळे व त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा नोंदविणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अद्याप भर चौकात मारहाण करून देखील कोणालाही पोलिसांनी अटक केली नाही. तसेच वैद्यकीय तपासणीत जबर मारहाण समोर येत असताना त्याबाबतची कायदेशीर कारवाई झाली नसल्याने हिमांशु नामवाड यांनी आज पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांची भेट घेत अंकुश गोतावळे व त्यांच्या सहकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी लेखी निवेदनातून केली आहे. एका शुल्लक कारणातून संपूर्ण कुटुंबिययांना झालेल्या मारहाणीत पूर्वीचे वैमनस्य किंवा आकस आहे का याबाबत सखोल चौकशीची गरज आहे त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडीत कठोर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नामवाड कुटुंबीय करत आहे. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीच्या पार्श्वभूमी पोलीस प्रशासनाचा धाक गुंड प्रवृत्तीच्या लोकांत राहावा आणि कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे आता लक्ष लागले आहे.