खळबळजनक!!! सत्तेची नशा…..आदिवासी बांधवांप्रती असलेली विकृत मानसिकता उघड
काँग्रेसच्या जिप सदस्या मेघा नलगे यांची देवाडा येथील वैद्यकीय अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ
राजुरा पोलीस स्टेशन येथे ऑट्राँसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
(राजुराचंद्रपूर):-देवाडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नागनाथ डुडुळे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्या मेघा नलगे यांच्यावर राजुरा पोलीस स्टेशन येथे ऑट्राँसिटी व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. देवाडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. डुडुळे यांनी नलगे यांच्याविरोधात काल पहाटे गुन्हा नोंदविला आहे. विकृत मानसिकता सदर सदस्याला चांगलीच महागात पडण्याचे चित्र निर्माण झाले आहे. या खळबळजनक घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली असून यामुळे परिसरात चर्चेला एकच उधाण आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, देवाडा येथे कोव्हिड लसीकरण कार्यक्रमला 13 मार्चपासून सुरवात करण्यात येणार होती. यासाठी क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे उदघाटन करून लसीकरणाची सुरवात करण्यात येणार होती. यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा येथील डॉ. डुडुळे यांनी नियोजन केले होते. याची माहिती त्यांनी जिप सदस्या मेघा नलगे, पंचायत समिती सभापती मुमताज जावेद, देवाडा येथील रहिवासी असलेले जिप सदस्य डॉ. नामदेवराव करमनकर, माजी पंचायत समिती सदस्य जमीर शेख, सरपंच लक्ष्मीबाई पंधरे, उपसरपंच जावेद भाई, पोलीस पाटील अजय शेंडे, पत्रकार मडावी, ग्रामपंचायत सदस्या मंजुषा अनमुलवार यांना दूरध्वनीद्वारे सदरची माहिती देऊन सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली होती.
सुरवातीला कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भाने सकाळी 9:30 वाजता सभापती यांना कळविले असता त्यांनी एक तासानंतर आम्ही येऊ असे सांगितले. यामुळे जमलेल्या सर्व मंडळींना डॉ. डुडुळे यांनी एक तासानंतर या अशी विनंती केली. यानंतर ते घरी जाऊन परत एक तासानंतर उपस्थित झाले. 10:30 वाजता पुन्हा डॉक्टरांनी सभापती यांना फोन केला असता थोडे थांबा आम्ही थोड्या वेळाने येणार असे सांगितले. 10:45 वाजता नलगे यांना फोन केल्यानंतर त्यांनी मी आता राजुरा येथे उदघाटन कार्यक्रमात असल्याने अडीच वाजेपर्यंत येणे होणार नाही असे सांगितले. अडीच वाजता सर्व पाहुणे मंडळी उपस्थित असल्याने लसीकरण कार्यक्रम सुरु करावा या आशेने डॉक्टरांनी परत सभापती यांना फोन केला. त्यांनी आता येणे शक्य नाही उदयाला कार्यक्रम घेऊ असे सांगितले व नलगे मॅडम यांना फोन दिला. तेव्हा नलगे मॅडम यांनी ‘तुम्हाला काय गडबड सुटली कार्यक्रम सुरु करण्याची आम्ही सांगू तेव्हा कार्यक्रम होईल, तुम्हाला नगराळे साहेबांनी सांगितले नाही का’ असे म्हणून फोन कट केला. यानंतर डॉक्टरांनी डॉ. करमनकर यांना जिप सदस्या नलगे यांच्याशी बोलायची विनंती केली. डॉ. करमनकर यांनी मी नंतर त्यांच्याशी बोलेल. पहिले आपण कार्यक्रमाला सुरवात करू असे सांगितले.
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी रुग्ण बराच वेळ झाले ताटकळत आहेत, खूप उशीर झाला आहे, आपण कार्यक्रम सुरु करू असे बोलले. त्यामुळे उपस्थित मंडळी, पाहुण्यांच्या हस्ते संयुक्तपणे कार्यक्रमाचे फित कापून उदघाटन करत लसीकरण कार्याक्रमाला सुरवात करण्यात आली.
काल दिनांक 16 मार्चला डॉ. डुडुळे सायंकाळी 4 वाजता आपल्या कर्तव्यावर असताना जिप सदस्या नलगे, सभापती, उपसरपंच जावेद भाई व त्यांच्यासह पुन्हा दोन महिला आल्या. डॉक्टरांनी त्यांना बसायला सांगितले. मात्र नलगे यांनी तुम्ही आमचा मान ठेवला नाही असे म्हणत बसल्या. आमची वाट न बघता कार्यक्रम कसा घेतला असा प्रश्न केला. त्यावर डॉक्टरांनी रुग्ण बऱ्याच वेळापासून उपस्थित होते म्हणून कार्यक्रम घेतल्याचे सांगितले. मात्र नलगे यांनी मला न विचारता तुम्हाला कोणी आदेश दिला म्हणत अरेरावी करत डॉ. नगराळे यांना फोन लावला. त्यावेळेस एका रुग्णाची तपासणी करून त्यांना खोकल्याची औषधी दिली असता रुग्णांनी औषधी घेण्याबाबत विचारणा केली असता नलगे यांनी यांना काय समजते, ते औषध घेशील तर मरून जाशील, आमच्या जागा बळकावत आरक्षणाच्या भरवशावर नोकरीला लागले अशाप्रकारे जातीवाचक शिवीगाळ केली. डॉक्टरांनी जातीवाचक शिवीगाळ न करता वरिष्ठांना तक्रार करा असे सांगितले. त्याच वेळेस ओपीडी मधील गोंधळ ऐकून डॉक्टरांची पत्नी बाहेर आली असता त्यांनाही नलगे यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. चिडून डॉक्टरांवर चप्पल उगारत तुझे तंगडे तोडीन, इथे कसा राहतोस आठ दिवसात बदली करेन अशी शिविगाळ केली.
या प्रकरणी संबंधित अपमानित डॉक्टरांनी नलगे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला. नलगे यांच्यावर ऑट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करत कलम 186, 504, 506 व 3 (1) पोटकलम अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
काँग्रेसचे आदिवासी बांधवाबद्दलच्या विकृत मानसिकतेचे जिवंत उदाहरण जनतेला पाहावयास मिळाले. यावर कायदेशीर तसेच काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील पक्षश्रेष्ठींकडून यावर कोणती भूमिका घेतली जाते याकडे राजकीय, वैद्यकीय व आदिवासी बंधावसह परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.