नालेसफाईला मिळेना मुहूर्त!
राजुरा/विरेंद्र पुणेकर, १२ मार्च : तालुक्यातील बाबापूर/माणोली (बूज) येथे पावसाळा गेला हिवाळाही गेला आत्ता उन्हाळा आला तरीही अद्याप बाबापूर गावातील नालेसफाई झालेली नाही. गेली तीनचार वर्षे नालेसफाईकडे ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गावातील नाले तुंबलेल्या अवस्थेत आहेत.
सर्वच गाव-शहरांमध्ये पावसाळ्याच्या आधी नालेसफाई करण्यात येते. माणोली ग्रामीपंचायतीला मात्र अद्याप तसा मुहूर्त गवसलेला नाही.
सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी नाल्यातील कचरा व गाळ काढला जातो. नाले, लहान मोठ्या गटारी साफ न केल्यास मुसळधार पावसामुळे पाणी तुंबते. तसेच ते नागरी वस्तीत शिरण्याचा धोका असतो. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळे नेहमी पावसाळ्यापूर्वी सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात नाले, लहान मोठ्या गटारी यांची सफाई करण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. यंदा अनेक ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकांनी ही कामे पूर्ण केली आहेत. नाल्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी उगविलेल्या आहेत. तसेच गाळही साठला आहे. मोठ्या प्रमाणात उगविलेल्या जलपर्णींमुळे तसेच झाडा झुडपामुळे गटारे-नाल्याचे अस्तित्त्व दिसून येत नाही. गावाचे सांडपाणी वाहून संतोष पारखी यांचा शेतात जात आहे. याची जाणीव संतोष पारखी यांनी ग्रामीपंचायतला निवेदनातून कित्येकदा केली आहे. परंतु त्यात ग्रामीपंचायतद्वारे कुठला ही मार्ग काढण्यात आलेला नाही. तसेच मोट्या प्रमाणात प्लास्टिक, थर्माकोल आदी कचरा नाल्यात मिसळत गेला आहे. साचलेला कचरा कुजत गेल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. असे असताना गेली काही वर्षे या नाल्या साफ केल्याचे बाबापूरकरांच्या पाहण्यात आलेले नाही.
त्यामुळे नालेसफाई तातडीने होण्याची गरज आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. कोणताही स्वच्छतेमुळे आरोग्याचा धोका होण्याआधी या नाल्या सफाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.