आत्मा नियामक मंडळाची सभा संपन्न
आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रमाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा
चंद्रपूर, दि. 10 मार्च : चंद्रपूर आत्मा नियामक मंडळाची सभा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे उपस्थितीत दिनांक 5 मार्च रोजी वीस कलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे पार पडली. याप्रसंगी कृषी उपसंचालक तथा प्रभारी प्रकल्प उपसंचालक (आत्मा) रविंद्र मनोहरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. विनोद नागदेवते, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भि.डो. राजपूत, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक शंभुनाथ झा, उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ. सोमनाथे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळे, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. बळकटे, खादी ग्रामोद्योग चे प्रकल्प अधिकारी श्री आत्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम जसे शेतकरी प्रशिक्षण, अभ्यास दौरे, करडई प्रात्यक्षिके, स्मार्ट अंतर्गत उत्पादन भागीदारी प्रकल्प, परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती), खनिज विकास प्रतिष्ठान अंतर्गत मका आणि हरभरा प्रात्यक्षिके, शेतीशाळा, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांचे करिता कृषी पायाभूत सुविधा योजना, शेतकरी मित्र आणि शेतकरी सल्लागार समिती यांचे गठन, ग्राम कृषी विकास समिती गठीत करणे, 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याची योजना, विकेल ते पिकेल अभियानांतर्गत संत सावतामाळी रयत बाजार अभियान योजने अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेमधून नाविन्यपूर्ण बाबी अंतर्गत कार्यक्रम इत्यादी बाबीचा आढावा घेण्यात आला.
तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या यथार्थदर्शी कृषी संशोधन व विस्तार आराखड्याच्या पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी गुल्हाने यांचे हस्ते करण्यात आले तद्वतच सेंद्रिय शेती योजने अंतर्गत सेंद्रिय शेती मालाचे गटा मार्फत विक्री करिता “ऑरगॅनिक चांदा” या लोगोचे विमोचन करण्यात आले. तसेच 750 किलो क्षमतेच्या सेंद्रिय शेतमाल वाहनास रु. १.२० लाख इतके अनुदान, सेंद्रिय शेती कार्यक्रमा अंतर्गत औजारे भाड्याने खरेदी करणेच्या बाबी अंतर्गत डीबीटी तत्त्वावर अनुदान वितरण तसेच सन २०२१-२२ च्या आत्मा च्या वार्षिक कृती आराखड्यास आत्मा नियामक मंडळाने मान्यता प्रदान केली. आत्मा नियामक मंडळासमोर आत्मा यंत्रणे मार्फत राबविलेल्या बाबीचे सादरीकरण आत्माचे प्रकल्प संचालक रविंद्र मनोहरे यांनी केले.