चामोर्शी तालुक्यातील १६८ निराधारांना मिळाला आधार
सुखसागर झाडे । विविध प्रकारच्या दिव्यांग व्यक्तीसह निराधार असलेल्या चामोर्शी तालुक्यातील १६८ जणांना मासीक अर्थसहाय्य देण्याची प्रकरणे मंजूर करण्यात आली. संजय गांधी निराधार योजनेतून आता त्यांना मासिक अर्थसहाय्य मिळणार आहे.
निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, विधवा, परितक्त्या, अनाथ बालके इत्यादींचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरिता चामोर्शी तालुक्यातील महाराजस्व अभियान तथा समाधान शिबिरांतर्गत जनजागृती करून संबंधित व्यक्तीकडून अर्ज भरून घेण्यात आले होते.
विविध योजनेंतर्गत एकूण १७७ अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी १६८ अर्ज मंजूर करण्यात आले व ९अर्ज नामंजूर करण्यात आले असून सदर कामकाजची कार्यवाही संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा चामोर्शीचे तहसीलदार जितेंद्र शिकतोडे साहेब, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार दिलीप दुधबळे, लिपिक डि. सी. सहारे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत निकाली काढण्यात आले.