1 फेब्रुवारीपासून दुचाकीवर हेल्मेटचा वापर अनिवार्य
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकरी अजय गुल्हाने यांचे आदेश
चंद्रपूर दि. 27 : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद व सर्व शासकीय यंत्रणामध्ये कार्यालयात येताना अथवा कोणत्याही कामासाठी दुचाकी वाहन वापरताना शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करने अनिवार्य असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2021 पासून करण्यात येणार असून हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधीत अधिकारी व कर्मचारी हा मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील व त्यांची गंभीर नोंद घेण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरीकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होणेकरीता दरवर्षी संपुर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सोबत राज्यात रस्ता सुरक्षा पंधरवाडा साजरा करण्यात येतो. मोटार वाहन अधिनियमानुसार कोणतेही दोन चाकी वाहन रस्त्यावर चालविताना हेल्मेट परिधान करणे हे सक्तीचे आहे. तसेच वेळोवळी मा. उच्च न्यायालय व मा.सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे हे सक्तीचे असल्याबाबत निर्णय दिलेले आहेत. या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले आहे.
तसेच जिल्ह्यातील इतर सर्व खाजगी क्षेत्रातील आस्थापना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, एम.आय.डी.सी., शाळा, महाविद्यालय व कंपन्या यांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरासंबंधी प्रवृत्त करावे व यासाठी व्यवस्थापकीय स्तरावर नियंत्रण ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी त्यांना विनंती केली असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.