मनपातर्फे आयोजित सायकल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
651

मनपातर्फे आयोजित सायकल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर २२ जानेवारी – माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित सायकल मॅरेथॉनला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे दोनशे स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेत काही नियमित सराव करणाऱ्या सायकलपटूंनी सहभाग घेत स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.
चंद्रपूर शहरातील नागरिकांना या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले होते. त्यास शहवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या स्पर्धेचा प्रारंभ आयुक्त श्री. राजेश मोहिते, उपायुक्त श्री. विशाल वाघ, संतोष कंदेवार, सहायक आयुक्त शीतल वाकडे, धनंजय सरनाईक,  विद्या पाटील, महेश बारई, विजय बोरीकर, अनिल घुमडे,आशिष मोरे, रवींद्र हजारे, श्री. गोपाळ मुंदडा यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
प्रास्ताविकात आयुक्त श्री. राजेश मोहिते म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखता यावा,शहर स्वच्छ ,सुंदर व हरीत व्हावे म्हणुन शासनाने माझी वसुंधरा या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारीत शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिणे आता गरजेचे आहे. आपले शहर हे फार मोठे नाही त्यामानाने शहरातील गाड्यांची संख्या मोठी आहे, आपल्यातील प्रत्येकाने जर रोज ५ किलोमीटर सायकल चालविण्याचा संकल्प केला तर पर्यावरणात मोठा फरक पडेल. मनपाचे कर्मचारी आठवड्यातील एक दिवस सायकलने येतात हाच कित्ता सर्वांनी गिरवायला हवा.
सकाळी गांधी चौकातुन मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला. त्याआधी आपल्या वसुंधरेला सुरक्षित ठेवण्यासाठी मानवी कर्तव्यांची शपथ याप्रसंगी उपस्थितांना देण्यात आली. चंद्रपूर शहरातून मुख्य रस्त्याने गांधी चौक – प्रियदर्शिनी चौक – गांधी चौक असा स्पर्धेतील मार्ग निश्‍चित करण्यात आला होता. या मार्गावर महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. आरोग्य विभागातर्फे उपस्थित सर्वांना सॅनिटायझरचा वापर करण्यास देण्यात आले. भाग घेणाऱ्या सर्व सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आली होती तसेच बिस्कीट व पाण्याची सोयसुद्धा मनपातर्फे करण्यात आली होती.
योग नृत्य संस्थेद्वारा याप्रसंगी योग नृत्याद्वारे शारीरिक तंदुरुस्तीचे प्रात्यक्षिक याप्रसंगी देण्यात आले. याप्रसंगी विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, सायकलीस्ट क्लब, स्वयंसेवी संस्था, इको प्रो ,आयएमए, रोटरी, एसपीएम क्रिएशन यांचा सहभाग लाभला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here