सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीवर बाळासाहेबांनी केला संशय व्यक्त, शाईनच्या धर्तीवर वंचितचे किसान बाग आंदोलन.
मुंबई,दि. २१ – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही लागली की लावण्यात आली आहे, याचा शोध राज्य सरकारने घ्यावा, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते.
दिल्लीतील शाईन बाग आंदोलनानंतर राज्यात किसान बाग आंदोलन करण्यात येणार आहे. २७ जानेवारी रोजी राज्यभर हे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
देशातील शेतकरी अडचणीत असून देशभरातील लाखो शेतकरी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक बिल मागे घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी ते आंदोलन करीत आहेत. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे राज्यभर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवाय इतर मागण्यासाठी शाईन बागच्या धर्तीवर किसान बाग आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. २७ जानेवारी रोजी हे आंदोलन राज्यभर होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तीन हजार ७६९ सदस्यांनी विजय प्राप्त केला असून २८० ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. वंचित बहुजन आघाडीचा हा मोठा विजय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर कोरोनाची लस निर्मिती ज्या ठिकाणी होते त्या इन्स्टिट्यूटला आज अचानक आग लागली, आग लागली की लावण्यात आली याचा तपास राज्य सरकारने करावा, अशी प्रतिक्रिया ही ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी शेवटी दिली.