कटाक्ष:कोरोनाची दुसरी लाट आणि ईश्वरीय संकल्पना! जयंत माईणकर
ईश्वर या मानवी जीवनातील संकल्पनेला छेद देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे.आपल्या शास्त्रीय संशोधनाद्वारे पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरत आहे अशा अनेक संकल्पनाना तडा देणारे कोपर्निकस आणि गॅलिलिओ हे पण त्याच पठडीतले! पण खरा ईश्वर या संकल्पनेला तडा दिला तो उत्क्रांती वादाचा सिद्धांत मांडत चार्ल्स डार्विनने! मानव हा कोणी ईश्वराने जन्माला घातलेला प्राणी नसून हळूहळू विकसित पावत गेलेला सर्वात बुद्धिमान सजीव प्राणी ही वस्तुस्थिती आता सर्वमान्य झाली आहे.एकूणच शास्त्रज्ञांनी आणि अनेक द्रष्ट्या व्यक्तींनी ईश्वर ही संकल्पना किती भ्रामक किंवा थोतांड आहे हे सांगण्याचा सतत प्रयत्न केला तरीही आजही पृथ्वीवरील सुमारे ८०० कोटी मानवांपैकी निरीश्वरवादी आणि कुठलाही धर्म न पाळणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. एकूणच मानव, ईश्वर या संकल्पनेतून बाहेर पडण्यास अजूनही तयार नाही असं दिसतं! मला याबाबतीत सिंधू संस्कृतीचा उल्लेख जरूर करावासा वाटतो. जगातील या प्राचीन नागरी संस्कृतीत एकही सार्वजनिक प्रार्थनास्थळ नव्हतं. आपल्या धार्मिक श्रद्धा (त्या काळात असल्या तर)आपल्या घरात ठेवल्या जात असाव्यात. आणि हे सगळं आज आठवायचं कारण कोरोना किंवा कोविड १९ या विषाणूने जवळपास एक वर्षभर जखडून ठेवलं आहे. अगदी ज्या ईश्वराला अथवा आकाशातील बापाला मानव संकट निवारण करण्यासाठी ‘चढावा’ देऊन साकडं घालतात तो देव किंवा त्याची प्रार्थना स्थळं सुद्धा कित्येक महिने बंद होती. ,जगातील २५० कोटीहून जास्त लोकांचा धर्म असलेल्या ख्रिश्चन धर्माचा नाताळ हा सण अत्यंत कमी उपस्थितीत पार पडला. म्हणजे सर्व संकटांचा तारणहार ईश्वर आपल्या प्रार्थना स्थळात सात ते आठ महिने बंदिस्त होता. मी जाणीवपूर्वक प्रार्थना स्थळं असा उल्लेख करत आहे, जे सर्वच धर्माना लागू आहे. कारण मी कोणत्याही धर्माला सर्वात प्राचीन म्हणून श्रेष्ठ किंवा या धर्मातील लोक दानशूर म्हणून श्रेष्ठ अस मानत नाही.जर मानवाच्या कोणत्या एखाद्या जातीला, वंशाला श्रेष्ठ मानायचं असेल तर मी झाडावरून खाली उतरून दोन पायावर चालणाऱ्या आफ्रिकन प्राचीन माकडाला किंवा मानवाला श्रेष्ठ मानीन! धर्मोपदेशक आहेत म्हणून देव धर्म आहे असं म्हणण्यास हरकत नाही. पण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा या नियमानुसार सर्वच धर्मांची प्रार्थना स्थळं अत्यावश्यक या कॅटेगरीतुन वगळली गेली आणि यातच सार सामावलेलं आहे. माझ्यावर नेहमी केवळ बहुसंख्य समाजाच्या विरोधात लिहितो किंवा बोलतो असा आरोप केला जातो. पण आता तर सर्वच धर्मांची प्रार्थना स्थळ बंद होती. म्हणजे एकूणच ही ईश्वरीय शक्ती कोरोनाला रोखण्यासाठी असमर्थ ठरली आणि आधार घ्यावा लागला तो विज्ञानाचा! विज्ञानात पारंगत होऊनसुद्धा ईश्वरीय शक्तींवर विश्वास ठेवणाऱ्या माणसांची मला कीव कराविशी वाटते. यात ऑपरेशनच्या आधी आकाशातील बापाच नाव घेणाऱ्या डॉक्टरपासून, परीक्षेला जाण्याआधी देवाला नमस्कार करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे.
कोरोनाची लस येईल आणि मग पूर्वीसारखे सगळे आबादीआबाद होईल अशी वाट पहात अनेक जण बसले आहेत .पण कोरोनात नवीन नवीन जनुकीय बदल दिसून येत आहेत . त्यामुळे एकूणच लस किती उपयुक्त असेल , किती काळ तिचा परिणाम टिकेल असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत . भविष्यात यापेक्षाही भयंकर विषाणुंच्या साथी येतील असा इशारा प्रा जीन – जेकस मुयेंबे टॅंफम ( १९७६ साली इबोला चा शोध लावणारे शास्त्रज्ञ ) यानी दिला आहे.
विज्ञानाला मर्यादा असतात. आणि इथेच सर्वच धर्मांचे धर्मोपदेशक अगम्य अध्यात्माविषयी किंवा सर्वशक्तिमान देवाविषयी बोलू लागतात. त्यांच्या दृष्टीने विज्ञान जिथे संपत तिथे अध्यात्म सुरू होत. वास्तविक पाहता या दोघांचा काहीही संबंध नाही.विज्ञान हे बुद्धिमान मानवाच्या क्रियाशीलतेतून तयार झालेली मूर्त कल्पना! ज्याची सुरुवात कुंभाराच्या चाकापासून झाली अस आपण मानतो. आणि आज त्याच विज्ञानाच्या भरवशावर मानव जात कोरोनावर लस येण्याची वाट पहात आहे. स्मॉल पॉक्स किंवा देवी या रोगावर लस शोधून संपुर्ण मानव जातीवर उपकार करणाऱ्या एडवर्ड जेनर यांनी काही शतकांपूर्वी घालून दिलेल्या मार्गाने आपण जात आहोत. लस कोरोनाला थांबविल या आशेवर आपण जगत आहोत.
Survival of the fittest ” हा चार्ल्स डार्विनचा नियम . पण प्रतिजैविके आणि लसीकरण यांच्या साह्याने आपण या सिद्धांतातुन मार्ग काढण्याचा सतत प्रयत्न करत आहोत. सार्वजनिक जीवनात देखील आपण नव- सामान्य स्थिती स्वीकारायला हवी . मुखपट्टी ही आता कायम बरोबर ठेवण्याची वस्तू आहे . देवळे , मशिदी , चर्च, दर्गे यांशिवाय आपले चालू शकते हे आता आपल्याला कळले आहे . लग्न समारंभ फक्त अति – नजीकच्या लोकांना सामावून करता येतो हेही समजले आहे . अनावश्यक फिरणे टाळले , गर्दी टाळली , मुखपट्टी वापरली तर आपण जवळजवळ आजारी पडतच नाही हे ही आपल्याला जाणवले असेल . एकूणच जीवनशैली , जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन या सगळ्याचा कायम स्वरूपी विचार आपण सुरू केला पाहिजे . कारण या सर्व गोष्टी आपल्या आणि मानव जातीच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे! मातीच मडकं बनवून त्यात पाणी भरणाऱ्या पहिल्या शास्त्रज्ञापासून कींवा व्यक्तीपासून आज कोरोना वर लस शोधणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांना सलाम!त्यांच्याच मूळे आज मानव जात जिवंत आहे, ईश्वरीय शक्तीमुळे नाही! तूर्तास इतकेच!