कटाक्ष: वाजपेयी, जॉर्ज आणि प्रेमप्रकरण ! 

0
652

कटाक्ष: वाजपेयी, जॉर्ज आणि प्रेमप्रकरण ! 

जयंत माईणकर

 

‘आय एम मिसेस कौल स्पिकींग’!अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांना आलेल्या पत्रकारांच्या फोनवर उत्तर देणारी स्त्री होती अर्थात त्यांची महाविद्यालयीन जीवनापासूनची परिचित मिसेस राजकुमारी हकसर कौल! एखाद्या मध्यमवयीन प्रेमींच्या प्रेमावर बेतलेल्या चित्रपटाला शोभेल अशी ही प्रेमकहाणी!

दोघेही ग्वाल्हेरच्या महाविद्यालयात शिकत असताना दोघांच्या मनात एकमेकांविषयी आकर्षण! ते त्या काळाला अनुसरून पत्रात एकमेकांना लिहिलं सुद्धा! पण ती पत्र एकमेकांकडे पोचलीच नाहीत, अस म्हटलं जातं दरम्यान, काश्मिरी पंडित असलेल्या आणि सिंधीयांकडे शिक्षण विभागात उच्च पदावर काम करणाऱ्या तिच्या वडिलांनी गोविंद नारायण हकसर आणि आई मनमोहिनी यांनी ब्रज नारायण कौल नावाच्या एका तरुण काश्मिरी पंडित प्राध्यापकाशी तीच लग्न लावून दिलं. वाजपेयी ब्राम्हण असले तरीही ते काश्मिरी पंडित नसल्याने मागे पडल्याचं बोललं जात. दिल्लीच्या राजमस महाविद्यालयात प्राध्यापक आणि होस्टेलचे रेकटर असलेले प्रा कौल अर्थात भारताच्या पहिल्या राजकीय परिवाराचे ‘नेहरू गांधी ‘ परिवाराचे नातेवाईक होते. आणि त्याच दरम्यान १९५७ला पहिल्यांदा लोकसभेत निवडून आल्यानंतर वाजपेयींचा मुक्काम कायम दिल्लीत झाला. आता काश्मिरी पंडित नसलेले वाजपेयी एक ‘ राईझींग पोलिटिकल स्टार’ झाले होते. अर्थात दिल्लीत पुन्हा दोघांच्या भेटी प्राध्यापक महाशयांच्या घरी सुरू झाल्या. होस्टेलच्या रेकटर असलेले कौल मुलांनी रात्रीच्या वेळी एखादा पेग मारायला जाऊ नये म्हणुन फेरफटका मारायचे. त्यांच्या या कडक शिस्तीला कंटाळलेले विद्यार्थी शिस्त कमी करावी अशी तक्रारवजा विनंती करायला राजकुमारी कौल यांच्याकडे गेले असता त्यांच्या घरी वाजपेयी असल्याचं कथित रित्या आजही लिहिलेलं आढळत. दरम्यान कौल यांना नमिता आणि नंदिनी अशा दोन मुली पण झाल्या. मोठी मुलगी आज अमेरिकेत असते आणि आपल्या पत्नीशी, राजकुमारीशी घटस्फोट घेतल्यानंतर प्राध्यापक महाशय अमेरिकेत गेले आणि तिथेच त्यांचं निधन झालं.
धाकटी मुलगी नंदिता हिला वाजपेयींनी दत्तक घेतले आणि १९७७ला परराष्ट्रमंत्री झाल्यापासून त्यांच्या बंगल्यात राजकुमारी आणि त्यांच्या कन्येचा दबदबा होता. वाजपेयी पंतप्रधान असताना याच नंदीताचे पती रंजन यांच्याविरुद्ध भ्रष्टाराचे कथित आरोप केले गेले वाजपेयींना अग्नी दिला तोही नंदिता आणि तिची मुलगी निहारिकानी!
मात्र, परराष्ट्रमंत्री असताना जपान कौंसुलेटच्या पार्टीत, वाजपेयी मद्यधुंद होते अशी तक्रार तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याकडे करणाऱ्या डॉ सुब्रमण्यम स्वामींच्या मते दत्तक घेतलेली मुलगी ही वाजपेयींचीच आहे! एकूणच पूर्ण वेळ संघाचे प्रचारक असलेल्या वाजपेयींना संघ परिवाराने प्रचारकांसाठी असलेल्या कडक नियम बरीच मोठी सवलत दिलेली होती.

एकूणच संघ-भाजपने देशाला दिलेल्या दोन पंतप्रधानांच व्यक्तिगत जीवन फार इंटरेस्टिंग आहे. वाजपेयी अविवाहित राहिले. पण संघ परिवाराच्या नितीमत्तेत न बसणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी खुलेआम केल्या. ज्यामध्ये कथित रित्या दारू पिण्यापासून लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या विवाहित मैत्रिणीबरोबर राहण्याचाही समावेश आहे.

तर दुसरीकडे नरेन्द्र मोदी यांनी जसोदाबेनशी विवाह केला आणि तरीही तिला कायदेशीर रित्या न सोडता पण सोडून देऊन ते संघाचे प्रचारक बनले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पत्नी म्हणून जसोदाबेनच नाव प्रथम लिहिलं. पण दोघेही कधीही एकत्र दिसले नाहीत.

बंद सम्राट, समाजवादी नेते माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांची तर कथा अजूनच निराळी. लहानपणी पाद्री बनण्याचा विचार केलेले आणि पुढे मुंबईत येऊन कामगार आणि समाजवादी नेता म्हणून ख्यातीप्राप्त झालेले जॉर्ज १९६७ साली स का पाटील यांचा पराभव करून लोकसभेवर निवडून आले.वाजपेयींची प्रेमकहाणी मध्यम वयातील तर जॉर्ज यांच्या दोन प्रेम कहाण्यातील पहिली तरुणपणात एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबरोबर तर दुसरी मध्यम वयातील प्रेमकहाणी एका आय ए एस ऑफिसरच्या पत्नीशी!

समाजवादी पक्षाचे खासदार आणि जनरल सेक्रेटरी असताना कलकत्त्याहून मुंबई ला विमान प्रवासात त्यांची ओळख झाली लैला हुमायून कबीर यांच्याशी. हुमायून कबीर नेहरू मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित.

मुंबई दिनांक या आपल्या कादंबरीत स्व अरुण साधूंनी डीकास्टा या कामगार नेत्याचं पात्र जॉर्ज यांच्यावर आधारित आहे. तर कादंबरीत एक मंत्र्याची मुलगी दाखविली आहे जी डीकास्टा ची प्रेयसी असते. अर्थात कादंबरीतील दोन्ही पात्रे कोणावर आधारित आहेत हे सांगणे न लगे!

लैला, जॉर्ज विवाहबद्ध झाले आणि त्यांना एक मुलगाही झाला.त्याच नाव सिन. बंदसम्राट जॉर्ज यांचा तो चढतीचा काळ होता. मोरारजी देसाई मंत्रिमंडळात ते उद्योग मंत्री झाले आणि काश्मीरचे पाहिले आय ए एस ऑफिसर टोनी जेटली त्यांचे स्वीय सहायक होते. जेटलीच लग्न एका केरळी मुलीशी (जया) झालेलं आणि त्यांना दोन मुलं झालेली. त्यांची मुलगी नृत्यांगना अदिती क्रिकेटर अजय जाडेजाची पत्नी आहे. जॉर्ज यांच्या समाजवादी विचारांकडे जया आकर्षित झाल्या तर जॉर्ज जयाकडे!

१९७७-७८ ला सुरू झालेल्या या प्रकरणाचा पूर्वार्ध संपला जेव्हा १९८४ साली लैला जॉर्ज यांच्या घरातून बाहेर पडला आणि जेटलींशी घटस्फोट घेतलेल्या जया जॉर्ज यांच्याबरोबर कथित लिविंग रिलेशनशिपमध्ये राहू लागल्या ते पुढील २४ वर्षे! याच काळात अदितीच्या अजय जाडेजाशी लग्न झालं.त्यावेळेस काढलेला एक फोटो चांगलाच गाजला होता. फोटोत वर वधु बरोबर जॉर्ज, जया आणि टोनी जेटली उभे होते.

जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त होऊन काही वर्षांपूर्वीच निधन पावलेले जेटली अब्दुल्ला परिवाराच्या फार निकटवर्तीय होते.

या २४ वर्षात जया जेटली, राजकुमारी कौल प्रमाणेच नाव न बदलता जॉर्ज यांच्याबरोबर राहिल्या. समता पक्षातले तंटे मिटविण्यासाठी लोकं त्यांच्याकडे येत असत. बहुचर्चित तहलका मध्ये सुद्धा जया जेटली यांचं नाव आलं होतं. पण २००४ नंतर जॉर्ज यांच्या ढासळत्या प्रकृती बरोबरच जया यांचं जॉर्ज यांच्या घरातील स्थान डळमळीत झालं आणि लैला पुन्हा जॉर्ज यांच्याकडे वापस आल्या तर जॉर्जना भेटायला जया जेटलीना चक्क कोर्टात धाव घ्यावी लागली. राजकुमारी कौल यांचं २०१४ ला निधन झालं. त्यावेळी वाजपेयींच्या सांत्वनाला सोनिया गांधी आल्या होत्या. वाजपेयी, जॉर्ज हयात नाहीत. लैला कबिर आपल्या मुलाबरोबर तर जया जेटली आपल्या मुलीकडे आदितीकडे राहतात. विविध राजकारण्यांच,सेलेब्रिटीजच व्यक्तिगत जीवन चवीचवीने वाचणाऱ्या वाचकांसाठी दोन मोठ्या राजकारण्यांच व्यक्तीगत जीवन थोडक्यात सांगण्यासाठी हा लेख प्रपंच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here