निपाच्या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी मणिबाई गुजराती शाळेची निवड

0
814

 

निपाच्या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी मणिबाई गुजराती शाळेची निवड

निवड झालेली राज्यातील एकमेव शाळा, सलग दुसऱ्या वर्षी निवड, मुख्याध्यापिका अंजली देव करणार सादरीकरण

प्रतिनिधी/ देवेंद्र भोंडे

अमरावती : शैक्षणिक धोरण व कार्यात महत्वाची भूमिका असणाऱ्या राष्ट्रीय शैक्षिक योजना व प्रशासन संस्थानच्या (निपा) राष्ट्रीय चर्चासत्रासाठी राज्यातून दि. गुजराती एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित मणिबाई गुजराती हायस्कूल या एकमेव शाळेची निवड झाली आहे. राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होण्याचा शाळेला सलग दुसऱ्यांदा मान मिळाला आहे. आगामी १७ डिसेंबर रोजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली भवानीशंकर देव राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होवून करोना काळातील शैक्षणिक कार्यपद्धतीबाबत माहीती सादर करणार आहेत.
मणिबाई गुजराती हायस्कूलच्या ‘पिंक रूम’ या उपक्रमाची गतवर्षी राष्ट्रीय शैक्षणिक योजना व प्रशासन संस्थानने दखल घेतली होती. गतवर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या निपाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात मुख्याध्यापिका अंजली देव यांनी सादरीकरण केले होते. यानंतर यावर्षी देखील मणिबाई गुजराती हायस्कूलला राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी करण्यात आले आहे. यासंबंधीचे पत्र अंजली देव यांना निपाच्या संयोजिका डॉ. सुनीता चुंघ यांनी पाठविले आहे. निपाच्या चर्चासत्रात देशाच्या पाच राज्यातील पाच शाळांचा समावेश असून मणिबाई गुजराती शाळा ही महाराष्ट्रातील एकमेव शाळा आहे. मणिबाई गुजराती शाळेचे करोना संक्रमण काळातील शैक्षणिक कार्य, विद्यार्थी केंद्रीत उपक्रमे व अन्य शैक्षणिक विकासात्मक कामांची दखल घेवून निपा संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय चर्चासत्रासाठी निवड केली आहे. करोना संक्रमणामुळे यावर्षी ऑनलाईन चर्चासत्र होणार आहे. मुख्याध्यापिका अंजली देव करोना संक्रमण काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितार्थ राबविलेल्या उपक्रमाच्या माहीतीचे सादरीकरण करणार आहेत.
१७ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. चर्चासत्रात मणिबाई गुजराती शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली देव यांचेसह राजस्थानच्या उदयपुर, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश व आसाम राज्यातील चार शाळांचे मुख्याध्यापक त्यांच्या कार्याचे सादरीकरण करणार आहेत. गतवर्षी शाळेद्वारे पिक रूमची संकल्पना अस्तित्वात आणली होती. या उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर देखील घेण्यात आली होती. यावर्षी शाळेद्वारा करोना संक्रमण काळात देखील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची कामगिरी उत्तमपणे बजावण्यात आली आहे, याची दखल निमाने घेतली आहे. दरम्यान, निपाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात राज्यातून मणिबाई गुजराती शाळेला सादरीकरणाचा मान मिळाला आहे. याबद्दल मुख्याध्यापिका अंजली देव यांनी संस्थेचे अध्यक्ष दिलीपभाई पोपट, उपाध्यक्ष दिलीपभाई वस्तानी, सचिव परेशभाई राजा, कोषाध्यक्ष तुषारभाई श्रॉफ, सहसचिव हर्षदभाई उपाध्याय, माजी अध्यक्ष मुकेशभाई गगलानी, सदस्य अरूणभाई टांक, भारतभाई भायानी, डॉ. भारतभाई शाह, अॅड. धर्मेशभाई सागलानी, जितेंद्रभाई दोशी, निलेशभाई लाठीया, अॅड. निलेशभाई शाह, नितीनभाई (राजूभाई) लाठीया, राजेशभाई पटेल, संदीपभाई मेहता, योगेंद्र (राजूभाई) देसाई यांचेसह शाळेचे शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंद यांचे आभार मानले आहे. संस्थेचे संस्थेच्या कार्यकारिणीने मुख्याध्यापिका अंजली देव यांचे अभिनंदन केले आहे.

पिंक रूम उपक्रमाचे सादरीकरण
पिंक रूमच्या नावीन्यपूर्ण व अत्यावश्यक उपक्रमाच्या माध्यमातून मणिबाई गुजराती हायस्कूलने राष्ट्रीय पातळीवरील चर्चेत सहभागी होण्याचा मान मिळविला होता. पिंक रूमचा उपक्रम देशभरातील अन्य शाळांनी राबविण्यासाठी निमा आग्रही आहे. १७ तारखेला होणाऱ्या निमाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात पिंक रूमचे सादरीकरण काण्यावर निमाच्या आयोजकांनी भर दिला आहे.

अमरावती राष्ट्रीय पातळीवर
पिंक रूमच्या माध्यमातून मणिबाई गुजराती शाळेने गतवर्षी राष्ट्रीय पातळीवर नव्या उपक्रमाचे सादरीकरण केले होते. यावर्षी निपाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात पुन्हा शाळेची निवड झाल्याने अमरावती राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. मणिबाई गुजराती शाळेच्या शैक्षणिक कार्याबद्दल समाजातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here