गावाकडे प्रेरणेच्या गोष्टी खूपच असतात.फक्त त्यांना जगासमोर आणणे महत्वाचे असते.असेच महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान कार्यरत चकफूटाना येथील एका आजीची गोष्ट.. म्हणतात शिक्षणाला नाही बंधने वयाची साक्षरतेमुळे होईल प्रगती देशाची.या वाचनवेड्या निरक्षर बाईच्या साक्षरतेची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे.
पोंभुरणा तालुक्यातील चकफूटाना या छोट्याशा गावातील कमलाबाई धोंडूजी शंभलकर वयाची पन्नाशी ओलांडल्या आहेत.प्राथमिक शाळा चकफूटाना येथे स्वयंपाक करून आपला गुजराण करतात.पतीचे निधन झाले असून दोन मुलीच आहेत.त्यांचे सुद्धा लग्न होऊन त्या सासरी सुखाने नांदत आहेत.आता कमलाबाई एकट्याच असतात.शांत स्वभावी आणि मायाळू.त्यांच्याबद्दल लिहायचं म्हणजे त्यांच्यात असलेली शिकण्याची गोडी आणि धडपड.म्हणतात ना शिक्षणाला वयाचे बंधन नसते.मानव हा आजन्म विध्यार्थी असतो.
लहानपणापासून कमलाबाई ला शिक्षणाची आवड होती.परंतु वडिलांनी मुलगी शिकून काय करणार म्हणून शाळेत पाठवला नाही.तरीपण आपल्या देशात त्या वेळी स्त्री म्हणजे “चूल आणि मूल” ह्या पलीकडे विचार करत नसत.त्यामुळेच कमलाबाई शाळेत जाऊ शकल्या नाही.आणि त्या निरक्षरच राहल्या.याची खंत त्यांना जीवनभर राहली.पण माणसाच्या मनात दृढ ईच्छाशक्ती,आत्मविश्वास आणि तळमळ असली तर माणूस कोणत्याही वयात ते काम सुरू करू शकतो हे कमलाबाईंनी दाखवून दिले. एखादी कार्य किव्हा कल्पना प्रत्यक्षात साकारली जाण्याची घडी येते तेव्हा जगातील कुठलीही शक्ती तिला रोखू शकत नाही. हेच कमलाबाई यांनी सिद्द केलं.तर झाले असे त्यांना गावच्या प्राथमिक शाळेत मुलांना स्वयंपाक करून देण्याचे काम मिळालं.दररोज मुलांना स्वयंपाक बनवून देने त्यांचं काम. शाळेत सर्व मुले त्यांना प्रेमाने “जिजी” म्हणून हाक मारतात.स्वभावाने गोड आणि प्रेमळ.वय गेल्यानंतर तसं यावेळी त्यांना साक्षरतेचे काही वाटत नव्हतं.पण मनात खंत होतीच.असाच एक प्रसंग त्यांच्यासोबत घडला.त्यांना कोणीतरी तुला सही सुद्धा करता येत नाही असं टोचून बोलला.मग काय आजीने आपण साक्षर व्हायचं हा विडाच उचलला.हे होणार कसं तर ही जिजी स्वयंपाक झाल्यानंतर जेवणाची सुट्टी होईपर्यंत मुलांसोबत वर्गात जाऊन बसायची.स्वयंपाक घराच्या फरशीवर खडूने अक्षर गिरवू लागली.वाचनाची गोडी आणि शिकण्याची आवड असल्याने त्या वर्गात शिकू लागल्या.यासाठी शाळेचे शिक्षक चांदेकर सर, सोनूले सर,मारबते सर यांनी सुद्धा मेहनत आणि मार्गदर्शन केले व मुलांसारखे त्यांना पण शिकवू लागले.त्यामुळेच ही जिजी आता वाचायला लागली. या आजीने स्वतःचे दप्तर सुद्धा तयार केला .त्यात पाटी, पेन्सिल,अंकलिपी व वाचनाचे पुस्तके आहेत.घरात किव्हा कुठेही वर्तमानपत्राचा कागद मिळो किव्हा भिंतीवरचे अक्षर ही ते वाचून काढते.आपल्याला वाचता लिहता येतो याचा आनंद तिला खूपच समाधान देऊन जाणारा आहे.आपण आता निरक्षर नाही आपणसुद्धा चार पुस्तके वाचू शकतो याचे समाधान आणि आनंद तिला नक्की सुखावणारा आहे.घरी आता त्या एकट्या नसून सोबतीला त्यांच्यासोबत पुस्तके असतात.खरंच ज्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असेल आणि जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल त्याला जिंकण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.फक्त तो आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करावा लागतो.हेच कमलाबाईने करून दाखवलं.
आज मला खूपच आनंद झाला.मी वाचनालयात वाचत असताना कमलाबाई तिथे आल्या.हाती पुस्तक घेतल्या.मला वाटलं आता नातीनला वाचायला लावणार पण त्या स्वतः वाचू लागल्या.मला खरं तर यावर विश्वासच बसला नाही.एक स्त्री जी कधी शाळेत गेली नाही तिला कसं काय वाचता येतो.तेव्हा त्यांनी शाळेतील हा सर्व प्रकार सांगितला.
त्यांचा वाचन एकूण खूपच बरं वाटलं.यासाठी की त्यांनी आपली इच्छाशक्ती आणि वाचनात असलेली आवड सोडली नाही.मी आताच्या पुष्कळ सातवी ते एकरावी बारावी च्या मुलामुलींना बघितला ते शाळेत जाऊन सुद्धा त्यांना धड वाचता येत नाही. तर ह्या कामलाबाई चे वाचन बघून त्यांना नक्कीच लाजवणार आहे.
आजची पिढी वाचनाकडे दुर्लक्ष करत चालली असून मोबाईल च्या जाळयात अडकत चालली आहे.त्यातच कमलाबाई ला वाचनाचं वेड लागला आहे.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान तर्फे गावात वाचनालय उभारण्यात आले असून आज नक्कीच त्याचे सार्थक झाल्यासारखे आहे.कारण असे वाचक लाभल्यास याचा सार्थक आनंदच वाटतो.
सारे शिकूया पुढे जाऊया.
शब्दांकन- धर्मेंद्र घरत(CMRDF)
ब्लॉक पोंभुरणा