मंदा पडवेकर “वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड – २०२०” ने सन्मानीत
चंद्रपूर : वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसदीय संघाच्या वतीने दिला जाणारा “वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड – २०२०” हा पुरस्कार चंद्रपूर येथील समाजसेविका व साहित्यीका मंदा भगवान पडवेकर यांना नुकताच ( श्रीरामपूर )अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला.
श्रीरामपूर नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या एका साध्या समारंभात कोरोना व्हायरसच्या सावटाखाली शासनाच्या सर्व नियमांचे यथायोग्य पालन करत श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी अनिल पवार, श्रीरामपूरचे तहसिलदार प्रशांत पाटील, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, महाराष्ट्र संपादक परिषद मुंबईचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
मंदा पडवेकर या विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्य करत असून समाजातील दुर्बल व गरजू घटकांना मदत करणे हा त्यांचा पिंड आहे. तसेच साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान दखलपात्र आहे. चंद्रपूर आकाशवाणीवरही त्यांचे समाजप्रबोधन करणारे अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंटच्या महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी दखल घेत या मानाच्या पुरस्कारासाठी निवड केली.