ज्येष्ठ पत्रकार मोहन रायपुरे यांचे निधन
राजु झाडे
चंद्रपूर:– ज्येष्ठ पत्रकार, आदर्श शिक्षक मोहन रायपुरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शहरातील रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 76 वर्षांचे होते. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या उभारणीत मोलाचा सहभाग असलेले मोहन रायपुरे हाडाचे शिक्षक होते. चंद्रपूर महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक व त्यानंतर अनुभवी मुख्याध्यापक रुपात त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली. काही वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. मात्र शिक्षकी पेशात असताना व नंतरही त्यांनी सक्रिय पत्रकारिता करत विविध सामाजिक मुद्दे लावून धरत उत्तम कार्य केले. त्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ सेवा देण्यासाठी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा कर्मवीर पुरस्कार २०१७ या वर्षी देण्यात आला होता. मोहन रायपूरे हे पत्रकारिता क्षेत्रात ४० वर्षापासून कार्यरत होते. ते दैनिक चंद्रपूर समाचार व लॉर्ड बुध्दा टि. व्ही. चॅनलचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. आंबेडकर फेलोशिप यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आज संध्याकाळी छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी ,५ मुली व १ मुलगा, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. सोमवार 30 नोव्हेंबर रोजी शांतिधाम स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.