नवनिर्मित गडचिराेली जिल्ह्याचा प्रवास आणि विकास!

0
844

नवनिर्मित गडचिराेली जिल्ह्याचा प्रवास आणि विकास!

गडचिराेली । विदर्भातील सुपरिचीत जेष्ठ लेखिका तसेच महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल ग्रुपच्या सदस्या कुसुमताई अलाम यांनी अख्ख्या महाराष्ट्रात आदिवासी जिल्हा म्हणून आेळखल्या जाणां-या गडचिराेली जिल्ह्यच्या ज्वलंत समस्येवर आपल्या लेखातुन प्रकाश ज्याेत टाकला आहे .ताे लेख येथे खास वाचकांसाठी देत आहाेत.
🟫🟩☀️लॉकडाऊननंतर प्रथमच बसने भामरागडला प्रवासाचा योग आला. सकाळी ७.३० ची गडचिरोली लाहेरी बस एकदम फुल भरलेली. सोशल डिस्टंन्स व फिजीकल डिस्टसिंगची ऐसी तैसी. नेहमीच आष्टीला बस थांबते व डॉयवर कंडक्टर चाय, पाणी घेतात ठाऊक माणून मी लघुशंकेकरीता उतरले. तेवढयात बस सुटली. सोबत मुलगा होता गाडीत बसलेला मागच्या सिटवर. त्याला फोन लावला. त्याने आई स्टॅंडवरच विसरली हे वाहकाला सांगितले, पुढे निघून गेलेली बस थांबली. मी एका दुचाकीवाल्यास बसपर्यंत सोडायला विनंती केली, त्याने बसपर्यंत सोडले. मी बसमध्ये चढत चालत बडबडले. 🟪☀️🟢शेजारी बसलेल्या व्यक्तीला माहित आहे की मी उतरले व माझी पिशवी सीटवर आहे तेव्हा… त्याचे जागेवर मी असते तर ! म्हणत सीटवर येवून बसले. बस सुटली. बसमधील अनेकांनी मास्क, रुमाल, ओढाणी, दुपट्टे बांधलेले होते. अनेकांची नाक, तोंड मोकळेच होते. भामरागडला पोचताच उतरतांना कंडक्टरला मी विचारले. परतीची बस कधीची आहे. ते म्हणाले, सायंकाळी अहेरीवरुन येईल पाच वाजता. त्यापूर्वी खासगी वाहन काळी पिवळी सुटेल. आमची गाडी परत जाणार अर्ध्या तासाने, त्याने सांगितले. मी ऐकत पुढे निघुन गेले. मला ऑफिसमध्ये काम होते. लवकर होईल तर बरे असे वाटले. पाच मिनीटाचे काम होतं. पण संबंधीत टेबलचे क्लर्क जेवायला गेल्याने मला भामरागडला चार तासांचा टाईमपास झाला.
भामरागड माझेसाठी नवखे नाहीच. अनेक वर्षांपासून सतत ये – जा असते.मला जुना प्रवास आठवला.१९८३ चा पहिला भामरागड प्रवास, एटापल्लीवरून झाला होता. एटापल्ली ते आलापल्ली बसने प्रवास त्यानंतर आलापल्लीत तासंतास वाट बघूनही कोणतेही वाहन मिळत नव्हते. कोडापे सरांच्या आग्रहामुळे मी लाहेरीस जात होते. माझे पती ( टीडीआय) Tribal development Inspector त्यांना आदिवासी आश्रमशाळा तपासणी व आदिवासींना योजना पूरवण्याचे विशेषत: आँईल इंजिन वाटपाचे काम करण्यासाठी फार्म भरून घेणे, इत्यादी कामे करावी लागत. आलापल्लीत बरीच वाट पाहिल्यानंतर एक ट्रक भामरागडला जाणार असल्याची माहिती मिळताच अनेक प्रवासी आपले बोचकेबाचके सांभाळत तयारीला लागले.बापरे! ट्रकने प्रवास! मी म्हटले. कोडापे सर म्हणाले, याशिवाय उपाय नाही. मला कधीही ट्रकमध्ये बसण्याचा योग आला नाही. मी प्रथमच ट्रकचा प्रवास करणार होते. मी ट्रकमध्ये चढण्याचा प्रयास करत होते. पण जमेना. तेव्हा कोडापे सरांनी मला अलगद चढवले, जणू मला ‘एवरेस्ट’ शिखर चढल्याचा आनंद झाला. गडचिरोली ते आलापल्ली प्रवासात आष्टीनंतरचे दाट जंगल बसच्या खिडकीतून अनेकदा बघितले. पण खुल्या ट्रकमधुन कच्या अरुंद रस्त्याने जाताना झाडांचा स्पर्श होत होता. मला मधोमध बसण्याची व्यवस्था केली होती. अनेक प्रवासी महिला- पुरुष बसलेही होते. पण मला ते जंगल, तो कच्चा रस्ता, हेलकावे सारे अनुभवायचे होते. आम्हाला भामरागडला पोहचण्यास बरीच रात्र झाली होती. ८.३० ते ९ वाजले असावेत. आजुबाजुची किरकोळ दुकाने बंद होती. एक हॉटेलवजा कुडाची खोपडी होती, तेथे कोडापे सरांनी विचारपुस केली. एक म्हातारी झोपेतून उठून आमचेसाठी स्वयंपाक तयार करण्याकरिता चुल पेटवू लागली. कदाचीत तिला तसा सराव असावा. ट्रकवाले उशिरापर्यंत पोचत असणार, ती त्यांचेसाठी उठून स्वयंपाक बनवत असावी. कारण झोपेतून उठूनही तिने नाराजी किंवा कां कू ,कुरबूर काहीही न करता जेवण दिले होते. रात्रो मी तिच्यासोबतच एका चटईवर झोपले. ती रात्र अविस्मरणीय होतीतशी दुसऱ्या दिवशीची सकाळसुध्दा. आदरणीय बाबा आमटे आपल्या वाघा च्या बछड्याला घेऊन फिरायला येऊन गेले होते.
लाहेरीस जाण्याची लगबग सुरू झाली. वाहनांची शोधाशोध सुरू असताना एक जंगल ठेकेदार पंजाबी गृहस्थ लाहेरीस जाणार असल्याचे समजले. कोडापे सरांनी तेथेही जुगाड जमवलाच. साहेबांची पत्नी सोबत आहे हे त्यांनी सांगितले. तेव्हा त्यांनी चहा नास्त्याकरिता आम्हाला घरी पाचारण केले. त्यांची सुंदर सुस्वाभावी पत्नी व आमचा केलेला आदर न विसरता येण्यासारखा आहे. जीपगाडीने आम्ही लाहेरीला पोहचलो. कोडापे सरांच्या घरी, त्यांची पत्नी वाट बघतच होती. तिने खूप आनंदाने आमचे स्वागत केले,जेवणं उरकली. व पुढे बिनागुंडाला जायचे ठरले. सोबत कोडापेताई पण सोबत येणाऱ होत्या. मला सोबत म्हणून. मुक्काम होणार असल्याने स्वयंपाकाचे सामान व अंथरून, पांघरून सोबत घेतले. जाण्याचे साधन तर तिकडे बांबू, सागवनचे मालवाहू ट्रकच. याखेरीज काहीच नाही. आम्ही परत ट्रकमध्ये बसलो. बिनागुंडा लाहेरीपासून १८ ते २० किलोमीटर असावा असे वाटते. उंच पहाडावर अतिदुर्गम भागात घनदाट जंगलाचा हा अनोखा प्रवास काळजावर कोरला गेला. 🟪🟢☀️बिनागुंडाला आमची व्यवस्था ‘गोटुल’ मध्ये करण्यात आली होती. बाहेरील सरकारी पाहुण्यांचे मुक्काम गोटुलातच केले जायचे. सोबतचे सर्व सामान गोटूलात ठेवून आम्ही कुणाची तरी भेट घेण्यास निघालो. ज्यांचे घरी गेलो ते सायबी पाटील असे नाव. ते घरी नव्हते. नारायणपुर छत्तीसगड च्या बाजाराला गेल्याचे कळले. छत्तीसगड सीमा (बार्डर) लागूनच आहे. तेथील सोयरीकी भामरागडपर्यंत केल्या जातात. सायबी पाटलाच्या घराला बाहेेरच एक कोट टांगलेले दिसले. आदिवासी माडियाच्या घरी कोट कसा काय? मला पडलेला प्रश्न, नंतर त्यांची हकीकत अशी सांगण्यात आली की, चांदाचे तत्कालीन जिल्हाधिकारी मा. जॉनी जोसेब साहेब यांनी सायेबी पाटीलास धोतर, कोट घालून मुंबई दाखविली. विमान, बस, रेल्वेगाडी वैगरे बघून परत आल्यानंतर सायेबी पाटलाने अंगावरील कोट उतरवून ठेवला तो कायमच. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तेथेच असतो लटकलेला. सायेबी पाटलाच्या अंगणात झाडेझुडे , कोंबड्या व मोर आढळले. मी प्रथम इतक्या जवळून मोर बघत होते. माझा तो आनंद कधीच विसरता येत नाही.
🟪☀️🟢सांयकाळ होत होती. हळूहळू अंधार पडू लागला. आमची स्वयंपाकाची लगबग सुरु झाली. पिशवीतील एक एक जिन्नस बाहेर काढताना लक्षात आले की, भाजीला फोडणीसाठी काढलेले तेल घरीच विसरले होते. खाण्याचे तेल नसल्याने ताई घाबऱ्या घुबऱ्या झाला, काय करावे? सर रागावतील, पण सांगावे लागले. लगेच सरांनी बांबू कटाईचे हमाल, ड्रायव्हर, क्लिनर कुठे स्वयंपाक करतात, तो ठिय्या शोधला व त्यांच्याकडून तेल मिळविले. पण ते जवस किंवा फल्ली तेल नव्हते तर टोळीचे तेल होते. मोहफुलानंतर टोळ लागते, त्या मोहाच्या टोळीच्या तेलाची फोडणी घातली आणि आमची जेवणं उरकली. आजूबाजुला खाटा व मध्ये शेकोटी अशी झोपण्याची रचना झाली. गोटूल अतिशय स्वच्छ सुंदर परिसरात होते. मोकळी जागा, होती सभोवती व मधोमल गोटुल. भोवताल लाकडाचे भक्कम कुंपण होते. गोटुलाची एक खोली होती. आत वाद्य आणि काही सामान ठेवले होते.
🟪🟢☀️रात्रीला माडीया आदिवासी भेटायला आले. ते कुंपनाच्या बाहेरून आम्हाला बघत होते. आणि आम्ही आतून कदाचित त्यांना आमचेविषयी कुतूहल वाटत असावे. कोडापे पती-पत्नी त्यांचेशी माडिया भाषेत बोलले. तेव्हा ते मोकळेपणाने बोलू लागले. आम्ही त्यांना ऐकत होतो. बरीच रात्र झाली, ते निघून गेले. आणि आम्ही आपापल्या जागी अंथरूणात. रात्री दोन- अडीच वाजले असावेत असा अंदाज आहे. शेकोटी विझली होती पण लाकडं जळत होती. कोडापे सरांनी लिलया ते विझविले. तेव्हापर्यंत मला कोडापेताईने उठविले होते. इथे काय घडत आहे समजत नव्हते पण वेगळं काहीतरी चाललं हे दिसत होतं. मी विचारल, त्यांनी मूकपणे बोटानी इशारा केला, गोटुलच्या बाहेर एक बिबट बसला होता आरामशीर. इतक्या जवळून मी वाघ बघत होते. मी डोक्यापासून पायापर्यंत पर्यंत पांघरून घेतले. झाडीबोलीत ‘बुडगारून’ घेतले, असे म्हणता येईल. व किंचित पांघरून बाजुला सारून श्वास रोखून त्यांचेकडे बघायची परत झाकून घायची, असा उपक्रम बराच वेळ चालला. काही वेळाने तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी आमचे साहेब व कोडापेसर शेतावर, नाल्यावर जाऊन ऑईल इंजीनची पाहणी करून आले होते. आमची जवणं आटोपली व सुप्रसिद्ध झरणा बघायला गेलो. अहाऽऽ हा, अप्रतिम फारच सुंदर असे ते ठिकाण. निर्मळ, सुंदर, स्वच्छ पाणी पडत आहे. बाजुला वाघाची गुहा होती. कदाचित वाघ तेथे नसावा. निसर्गाचं सौंदर्य डोळ्यातून ह्दयात टिपून घेतलं व जड पावलांनी तेथून परतीचा प्रवास सुरू केला.
☀️🟫🌀रात्री लाहेरीला अंगणात शेकोटी होतीच. जेवणानंतर आम्ही सभोवती बसलो, कुणीतरी एक व्यक्ती आदिवासींचा अभ्यास करणाऱ्या त्याच्या मित्राने पाठवलेले फार्म घेऊन आला. त्यात आदिवासी जीवनविषयक प्रश्नावली होती. ती त्यास भरुन पाठवायची होती. मी म्हटलं प्रश्नावली तुम्ही भरणार, आध्ययन ते करणार, कसे बरे शक्य आहे. अशा पिएचडी वाल्यांच्या अध्ययन कथा राहात असाव्यात. शिक्षक- विद्यार्थी यांच्याशी गप्पा करताना खूप आपलेपणा जाणवत होता. वेगळी भाषा ऐकतांना बरं वाटत होत. साता संमुद्रापलीकडचा प्रवास सोपा पण तो प्रवास कठीण होता. हे आठवतांना अंगावर रोमांच उठतात. कारण बिनागुंडाच्या पहाडीवरुन भरगच्च भरलेला बांबुट्रक त्यात आम्ही बसून आलो. जीव मुठीत घेवुन प्रवास होता. ट्रक हेलकावे खातखात खाली उतरत होता. ड्रायव्हरची कमालच होती. ती सारी आठवण मला कोरोना लॉकडाऊन काळातील एसटी बसने केलेला प्रवास करतांना झाली. आम्ही १९८३ नंतर च्या म्हणजे २०२० सालच्या भामरागडला तासंतास वाहनांची वाट बघत बसलो. एक काळीपिवळी लागली तिच्यात बसण्याखेरीज गत्यंतर नव्हते. गाडी गच्च भरेपर्यंत त्यांनी सोडली नाही. गाडीतबसून इतर प्रवासी कधी येतात, हे बघत असतानाच एक प्रेतयात्रा रस्त्यावरून गेली. १५ ते २० माणसे होती. वाजंत्री होते. मी विचारले म्हातारा आहे वाटतं. सहप्रवासी होते ते म्हणाले, म्हातारी आहे ती १०० वय वर्षाची. आम्ही भेट द्यायला तिच्या घरी गेलो होतो, पण तिचा मुलगा व सुनबाई कारोना पॉझीटीव्ह असल्याने परत आलो. मी ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानातील आहे. शिक्षक आहे, असे सांगतांना एवढयात नदीपर्यंत आम्ही पोहचलो. तो बघा कोरोना पॉझीटीव्ह मुलगा तिच्यावर आग्नीसंस्कार करत आहे, त्यांनी बोटाच्या इशाऱ्याने दाखवले. बापरे हे कसं काय? प्रशासन काय करते? एवढे लोक प्रेतयात्रेत सहभागी झाले, त्यांचे कसे? मी प्रश्नार्थक. मला त्या शिक्षकाने आपली कॅप/टोपी, मास्क व टीशर्ट दाखविली. मॅडम आम्ही अभियानात आहोत. या तीन वस्तु खेरीज आमच्या कडे कीट सुद्धा नाही. जे मयत झाले यांचे दुकान आहे. आणि कारोना काळातही ते सतत सूरुच असते. ग्राहकांची ये – जा असते. या भागाकडे कुणाचेही लक्ष नाही. समाजकारण, राजकारण, प्रशासन, लोकप्रतिनीधी सारेच विषय चर्चेला आले. प्रवासादरम्यान. एक आरोग्य सेविकाताई पण होत्या सोबत. त्यांनीही आपली परिस्थीती व आरोग्याच्या असुविधा कथन केल्या. इकडे इमारती झाल्या, रस्ते सुंदर झाले. विभागावार ऑफिस झाले, आश्रमशाळा, कॉलेजेस झाले. त्या अनुषंगाने कर्मचारी वर्ग वाढला. थोडाफार शिक्षणाचा प्रसारही झाला. इथल्या अनेक सुसज्य इमारती कुणी तरी वास्तव्यास यावेत, याच्या प्रतिक्षेत आहेत. अजून खाली मोकळयाच आहेत. आदिवासी विकासाचे तर काय बोलावेे. सामुहिक विवाह मेळावे होतात. मुलं पोटात असताना पासुनच्या सुविधा. जननी सुरक्षापर्यंत आहेत. त्यानंतर अंगणवाडी नंतर आश्रमशाळा. त्यानंतर तालुक्यात वसतीगुहे असा त्यांचा प्रवास आहे. पुढे काय? तर अनट्रेन्ड टिचर किंवा पोलीस, एखादा वनरक्षक किंवा तत्सम कुणी काहीतरी होतो. किंवा ग्रामपंचायत, पं.स., जि.प.सदस्य होतात. आश्रमशाळा, शासकीय आदिवासी आश्रमशाळा, वसतीगृहे हा चिंतनाचा विषय आहे. शिक्षणाचा खेळखंंडोबा उघड्या डोळयाने दिसतो. आरक्षण राजकारण, सत्ता, जंगल, खनिज, पाणी, रेती, वनउपज व आदिवासी चे कायदे यावर अभ्यास होणे गरजेचे आहे. जिल्हाचा आर्थिक बजेट, आदिवासी विकासाचा बजेट व त्याचे नियोजन आराखडे यावर कुणी स्पष्ट बोलत नाही. कुपोषण, नक्षलवादाने गडचिरोली जिल्ह्याची देशपातळीवरेील बदनामी थांबवू शकले नाही. दारूबंदी यावर ‘घमासान’ सुरू आहे. या विषयाला वाढविण्याची काहीच गरज नाही. दारू व खर्रा ही होलसेलरची मक्तेदारी आहे. सर्वसाधारण बेरोजगार याकडे व्यवसाय म्हणून बघतात. हे दुदैव आहे.व नाईलाज सुध्दा. सुरजागड लोहखनिज हा रोजगार देणारा प्रकल्प नाहीच. तर शाश्वत रोजगार लुटणारा आहे. यावर चिंतन का होत नाही? शासन व कंपनीचा लुटीचा गोरखधंदा बंद करायला लोकप्रतिनिधींना भीता का वाटते? आरोग्य विभागाच्या गाडीतून दारूगोळा, शस्त्रसाठा का पुरवला जातो? आदिवासींना नक्षली घोषीत करणे हा कार्यक्रम थांबत का नाही? घनदाट जंगल सपासप कापले जाते तेव्हा वनविभाग ढाराढूर झोप घेतो व आदिवासी किंवा वननिवासींना गरजेपोटी लाकडे आणायची असतील तर त्यांना मज्जाव होतो, असे का? वनहक्काने सर्वाधिक दावे मंजूर करून गडचिरोली जिल्ह्याने मानाचा तुरा देशामध्ये खोवला आहे. पण प्रलंबित दावे काढण्याची मुजोरी शासन/प्रशासन करते यावर सारे चूप का आहेत? गडचिरोलीच्या लेखामेंढा गावाने पेसा कायद्यान्वये देशात मानाचे स्थान पटकावले. मात्र, आदिवासी व गैरआदिवासी यांच्यात संभ्रम पसरवल्या गेला. तेव्हा प्रशासन ढिम्म राहिले. नक्षलवादाचा बिमोड करताना आदिवासींचा किती छळ होत आहे, याचे आत्मचिंतन कोण करेल? नद्यानाल्यांच्या जिल्ह्यात शेतकरी हवालदील झाला आहे. शिक्षणाचे वैभव गोंडवाना विद्यापीठ हे शिक्षण व त्याचा दर्जा याचे अजबगजब रसायन आहे, हे ऐकिवात आहे. महिलांचे प्रश्न व मुलींच्या आरोग्य शिक्षणाचे धिंडवडे यावर न संपणारी चर्चा होऊ शकते. हे सारे प्रश्न १९८३ नंतर आजही कायम आहेत. त्याउलट नवेनवे प्रश्न निर्माण झाले. आदिवासी व गैरआदिवासीत अनोखा संघर्ष सुरू आहे. हे राजकीय संघर्षाचे नवे गणित उदयास आले. या काळात.या बाबीवर कोण लक्ष देईल? 26/8/1982 ला जिल्हानिर्मिती झाली आणि जिल्हा निर्माणकर्त्यांनी विकासासंदर्भात जी स्वप्न बघितली होती. ती पुर्णत्वास गेली की नवे प्रश्न निर्माण होऊन जनता हवालदील झाली. याचा विचार घेऊन मी गडचिरोली गाठली.

संकलन – किरण घाटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here