समृद्ध गावांसाठी अविरोध निवडणूकांची गरज
ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर : आदर्श ग्राम घाटकुळ येथे ‘दिव्यग्राम २०२०’ महोत्सव :
घाटकुळ ( स्वप्नील बुटले ) :
वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता क्रांतीकारी व परिवर्तनवादी विचार देणारी आहे. त्यात पानोपानी समग्र ग्रामसुधारणेची असंख्य सूत्रे आहेत. माणसाला माणूस बनविणारा मानवधर्म राष्ट्रसंतांनी सांगितला. प्रत्येक गाव सुजलाम सुफलाम व्हावे. गावात सामुदायिक श्रमदान, शांतता व सुव्यवस्थतेच्या दृष्टीकोनातून ग्रामसभेच्या माध्यमातून अविरोध निवडणूका होणे काळाची गरज आहे. यासाठी गावक-यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले. युवा जनहित बहुउद्देशीय संस्था आयोजित आदर्श ग्राम घाटकुळ येथे ‘दिव्यग्राम २०२०’ महोत्सवात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स.सदस्य विनोद देशमुख तर अतिथी म्हणून गटविकास अधिकारी धनंजय साळवे, कवी नरेशकुमार बोरीकर, अशोक पाल, विठ्ठल धंदरे, मुकुंदा हासे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रास्ताविक ॲड.किरण पाल यांनी केले. आदर्श घाटकुळ गावाची दिवसेंदिवस होणारी प्रगती अबाधित राहण्यासाठी आगामी निवडणुका पक्ष व मतभेद विसरुन अविरोध व्हावी अशी भुमिका त्यांनी मांडली. अध्यक्षस्थाहून बोलतांना पं.स.सदस्य विनोद देशमुख म्हणाले, गावाने गावासाठी केलेले परिश्रम मोठे आहे. घाटकुळ राज्यात आदर्श ग्राम म्हणून नावलौकिक आहे. गावाचे हित लक्षात घेवून गावात अविरोध निवडणूकीतून पुन्हा आदर्श निर्माण करता येईल, हा आशावाद मांडला. गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी गावक-यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांचे स्वागत केले. ग्रामस्वच्छतेने व फटाकेमुक्त पर्यावरणपुरक वैचारिक दिव्यग्रामने दिवाळी साजरी करणा-या जनहित युवक मंडळाच्या युवकांचे कौतुक केले. प्रसिद्ध कवी नरेशकुमार बोरीकर यांनी कवितेतून जनजागृती करत गावक-यांनी ग्राम विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
यावेळी ग्रामविकासासाठी योगदान देणा-या गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच प्रीती मेदाळे, गंगाधर गद्देकार, पत्रू पाल, शशिकला पाल, सुमन राऊत, विमल झाडे, देवराव मेदाळे, विठ्ठल धंदरे यांचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिसंवादात देशाचे प्रतिनिधित्व करणारी बालपंचायत सरपंच काजल चांगदेव राळेगावकर व ग्राम कार्यकर्ता दिलीप कस्तुरे यांचा गौरव करण्यात आला. संचालन अविनाश पोईनकर तर आभार स्वप्निल बुटले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रविण राऊत, शुभम गुढी, राम राऊत, कार्तिक नरवाडे, रितिक शिंदे, देविदास धंदरे, संदीप शिंदे, शैलेश शिंदे, शंकर राऊत, राम चौधरी, युवा जनहित संस्था व मराठा युवक मंडळाच्या युवकांनी परिश्रम घेतले.
•••••••••••